पुणे: राजस्थानी संत्र्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने या संत्र्यांची गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात आवक घटली आहे. त्यातुलनेत मागणी अधिक असल्याने त्याच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या दरामुळे ग्राहकांसाठी राजस्तानचा संत्रा आंबट ठरत आहे.
महिनाभरापूर्वी राजस्थानातील भवानी बाजार येथून मार्केट यार्डातील फळबाजारात संत्र्याची आवक होत आहे. मात्र, तेथील हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आवक घटली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला 60 ते 100 रूपये दर मिळत आहे. बाजारात रोज सुमारे दोन ट्रकची आवक होत आहे. येत्या काळातही तुरळक आवक सुरूच राहणार असल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
हंगाम बहरात असताना बाजारात रोज 2 ते 2.5 हजार क्रेटची आवक होत होती. एका क्रेटमध्ये 18 किलो संत्रा होता. मागील वर्षी बाजारात एकाच वेळी नागपूर आणि राजस्तान संत्र्याची आवक सुरू होती. त्यामुळे आवक चांगली होती. दरही ग्राहकांच्या आवाक्यात होते. यंदा नागपूरच्या संत्र्याची आवक घटली आहे.
त्यामुळे बाजारात राजस्थान येथून आलेल्या संत्र्याची अधिक आवक होती. मागील वर्षी राजस्तानातून आलेल्या संत्र्याला प्रतिकिलोला 40 ते 70 रुपये दर मिळाला होता. तसेच, संत्र्याला पोषक वातावरणामुळे आवक अधिक असल्याने हंगामही अधिक काळ चालला होता. यंदा हंगाम लवकर संपल्याने बाजारातील आवक घटली असल्याचेही अरविंद मोरे यांनी सांगितले.
नागपूर संत्र्याची पन्नास टक्केच आवक23
अधिकच्या पावसाचा नागपूर संत्र्याला मोठा फटका बसला. मोठ्या प्रमाणात झाडांवरची फळे गळून पडल्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट झाली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात 50 टक्केच संत्र्याची आवक झाली. त्यामुळे दर अधिक होते. नागपूर संत्र्याचा हंगाम 15 दिवसांपूर्वीच संपला आहे. हंगाम रोज सुमारे 20 टनांची आवक झाली. 8 ते 10 डझनाच्या पेटीला 1300 ते 1500, तर 11 डझनाच्या पेटीला 1000 ते 1200 रुपये दर मिळाला.