पुणे: पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचा आणि यार्ड रिमॉडलिंगचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. या कामाला गती देण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्या आता लवकरच हडपसर आणि खडकी या उपनगरीय टर्मिनलवरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी यासंदर्भातील माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन असून, यामुळे पुण्याच्या रेल्वे प्रवासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे हे गाड्या स्थलांतरणाचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.
रेल्वेला वर्षभरात तब्बल 2,238 कोटींचा महसूल
रेल्वेच्या पुणे विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत तब्बल 2,238.20 कोटींचा एकूण महसूल मिळवला केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 3.7 टक्क्यांची भरीव वाढ नोंदविण्यात आली असून, प्रवासी संख्या आणि तिकीट तपासणी यांसारख्या क्षेत्रांत विभागाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम प्रवासी महसुलावर झाला असून, पुणे विभागाने 1,657.24 कोटी महसूल फक्त प्रवाशांकडून मिळवला आहे, हा महसूल मागील वर्षापेक्षा 13 टक्क्यांनी अधिक आहेत. विशेष म्हणजे, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिकीट तपासणीतून मिळणारा महसूल 57.5 टक्क्यांनी वाढून 30 कोटींवर पोहोचला आहे.
पुणे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम विहित मुदतीत पूर्ण करणे, हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. यासाठी काही गाड्यांचे स्थलांतर हडपसर आणि खडकी येथे करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो, मात्र भविष्यात त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा असणारे नवे पुणे रेल्वेस्थानक मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे, ही विनंती.राजेश कुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग
पुणे स्थानकाचा भार कमी करण्यासाठी उपनगरीय टर्मिनल्सचा वापर करणे ही काळाची गरज आहे. पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, रेल्वे प्रशासनाने फक्त गाड्या हलवून थांबू नये. हडपसर आणि खडकी स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलची पुरेशी बस सेवा आणि रिक्षा स्टँडचे नियोजन असणे आवश्यक आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत राहावे लागू नये, आणि त्यांची धावपळ होऊ नये, याची काळजी रेल्वेने घ्यावी. हडपसर भागात रस्ता रूंदीकरणासाठी आणि पीएमपीच्या बससेवेसाठी मी महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली. याबाबत पुन्हा पाठपुरावा करू.आनंद सप्तर्षी, सदस्य, प्रादेशिक रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे