Pune Railway
Pune Railway File Photo
पुणे

Pune Railway| ऑफ सीझनलाही पुणे रेल्वे स्टेशन फुल्ल

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळी सुट्या असो, सण असो किंवा आठवड्याचा विकेंड असो, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी ठरलेलीच ! मात्र, आता ऑफ सीझन आणि सुटीचा वार नसतानाही पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

बुधवारीही अशीच गर्दी पाहायला मिळाली, त्यामुळे आता पुणे रेल्वे स्टेशन ऑफ सीझनलाही फुल्ल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २०० ते २३० च्या घरात रेल्वेगाड्यांची ये-जा असते. त्याद्वारे येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात.

अलीकडील काळात या प्रवाशांमध्ये वाढ होत असून, पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचा प्रचंड ताण येत आहे. बुधवारी (दि. ३) केलेल्या पाहाणीवेळी पुणे रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. कोणताही सीझन नसताना प्रवाशांच्या या रांगा लागल्याचे दिसले.

एका खिडकीवर नव्हे तर स्थानकावरील प्रत्येक खिडकीवर अशा प्रकारे रांगा दिसल्या. ऑनलाइन तिकीट व्यवस्था असतानाही अशा प्रकारे तिकीट खिडक्यांवर इतक्या रांगा कशा काय लागल्या?

असा प्रश्न नक्कीच येथून ये-या करणाऱ्या नागरिकांना पडतो. यावरून आता पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याबरोबर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील इतर स्थानकांचा विकास करण्याची गरज असल्याचे सातत्याने समोर येत आहे

ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

पुणे रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. हडपसर आणि खडकी येथील टर्मिनलचा विकास करण्या संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली आहेत. मात्र, ही पावले म्हणावी तितक्या वेगाने पडत नसल्याचे दिसत आहे.

परिणामी, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सातत्याने गर्दीचा आणि रांगेत उभे राहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्या संदर्भातील ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT