पुणे: पुणे रेल्वेस्थानकावर गाड्यांची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांसाठी उभारलेल्या होल्डिंग एरियाला (अंबेला गेटखालील) आता आधुनिक सुविधांची जोड दिली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, स्नॅक्स काउंटर आणि वॉटर डिस्पेन्सरी (शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय) यांसारख्या अनेक उत्तम सुविधा मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अनेकदा गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांना तासनतास स्थानकावर ताटकळत बसावे लागते. अशा वेळी वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे हाल होतात. ही अडचण ओळखून रेल्वे प्रशासनाने येथील अंबेला गेटखाली होल्डिंग एरिया तयार केला आहे.
आता त्यामध्ये अधिक सुविधा पुरवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेची वाट पाहणे कंटाळवाणे वाटणार नाही, तर त्यांना तिथेच घरगुती वातावरणाचा फील मिळेल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
होल्डिंग एरियामध्ये काय असणार खास?
मल्टीपल मोबाईल चार्जिंग पॉइंट्स : प्रवाशांचे मोबाईल किंवा लॅपटॉप डिस्चार्ज होणार नाहीत, यासाठी पुरेशा प्रमाणात हाय-स्पीड चार्जिंग सॉकेट्स बसवले जातील.
स्नॅक्स आणि रिफेशमेंट काउंटर : प्रवाशांना चहा, कॉफी, बिस्किटे आणि हलका नाश्ता (स्नॅक्स) जागेवरच उपलब्ध करून दिला जाईल.
वॉटर डिस्पेन्सरी : शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक डिस्पेन्सर्स लावले जातील, जेणेकरून प्रवाशांना पाण्यासाठी लांब जावे लागणार नाही.
आरामदायी आसनव्यवस्था : प्रवाशांना विश्रांती घेता यावी, यासाठी आसनव्यवस्था अधिक आरामदायी आणि सोयीस्कर केली जाणार आहे.
प्रवाशांचे समाधान आणि त्यांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना स्थानकावर कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये म्हणून आम्ही अंबेला गेटखालील नवा होल्डिंग एरिया अधिकच्या सुविधांनी सुसज्ज करीत आहोत. या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.राजेशकुमार वर्मा, डीआरएम, मध्य रेल्वे, पुणे विभाग