पुणे: दिवाळी संपली आणि आता पुन्हा एकदा पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. सुट्यांमध्ये आपापल्या गावी, कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गेलेले पुणेकर चाकरमानी आता मोठ्या संख्येने कामावर परतत आहेत. यामुळे शनिवारी (दि.25) पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचे चित्र दिसत आहे. (Latest Pune News)
पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी केलेल्या पाहणीत प्लॅटफॉर्म क्रमांक एक समोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर स्थानकातून बाहेर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून येऊन पुण्यात नोकरी-व्यवसाय करणारे लोक गावावरून पुन्हा पुण्यात कामधंद्यासाठी येत असल्याने पुणे स्टेशन गर्दीने अक्षरशः फुलून गेल्याचे पहायला मिळाले. नोकरी, धंदा आणि शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या शहरातील पाहुण्यांची गावाकडची दिवाळी संपताच लगेच घरवापसी सुरू झाल्याचे दिसले. स्टेशनवर सामान घेऊन उतरणाऱ्या आणि लगबगीने बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिसली.
पुणे रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी राज्यासह देशातील इतर भागातील आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या अंदाजानुसार, बिहारमधील निवडणुका संपल्यानंतर, अंदाजे 9 तारखेनंतर (नोव्हेंबर) बिहारमधून पुण्यात परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले हे हजारो कामगार आपल्या गावीच असतील.
बिहारच्या प्रवाशांसाठी इलेक्शनचा बेक...!
शनिवारी या गर्दीबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी एक महत्त्वाचा फरक सांगितला. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुका सुरू असल्यामुळे, या भागातून गावी गेलेले बहुतांश प्रवासी अजून पुण्यात परतलेले नाहीत. दिवाळी आणि छटपूजेनंतर लगेच परतणारे हे चाकरमानी निवडणुकीमुळे बिहारलाच थांबले आहेत.