Crime News Pudhari
पुणे

Pune Railway Police Attack: रेल्वे पोलिसाचा गळा चिरला; गांजा ओढण्यास हटकले म्हणून तरुणांचा जीवघेणा हल्ला

पुण्यात धक्कादायक प्रकार; चाकूने गळा-छातीवर वार, डोक्यात दगड घातला; मोबाईलसह दीड लाखांची सोनसाखळीही लुटली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रेल्वेरुळावर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी पूर्वीच्या रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून त्याचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने हल्‍ला केला. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

दरम्यान, रेल्वे पोलिसाला रस्त्यात अडवून हल्ला केला असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्‍या आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे. अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पूना गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) असे गंभीररीत्या जखमी झालेल्याचे नाव आहे.

रॉकी रणजित पात्रौ, विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अक्षय बोंबाळे हे रेल्वेचे जीआरपीएफचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रेल्वेरुळ तसेच इतर परिसरात गस्त व पेट्रोलिंगचे काम आहे.

दरम्यान, ते रेल्वेरुळ परिसरात गस्त घालत असताना त्यांना आरोपी गांजा ओढताना दिसून आले होते. याबाबत त्यांनी आरोपींना यापूर्वी काहीवेळा हटकले होते. तसेच, त्यांना या परिसरातून हाकलून दिले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी देखील त्यांना रेल्वेरुळ परिसरातून हाकलून लावले होते. अक्षय बोंबाळे हे कर्तव्यावरून दुचाकीवर घरी जात होते. त्या वेळी रात्री साडेआठच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रोडजवळ ससून हॉस्पिटलच्या फुटपाथ येथे आरोपींनी त्यांना अडवले व शिवीगाळ सुरू केली. नंतर एकाने ‘तू आईला दारू व गांजा पितो, हे का सांगितले?’ असे म्हणत वाद घातला.

तसेच, आरोपींनी खाली पाडून धारदार चाकूने गळा चिरून व छातीवर वार केले. तर एकाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. आरोपींनी अक्षय यांच्याजवळील मोबाईल तसेच दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक गणेश चव्‍हाण, अंमलदार प्रदीप शितोळे, कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव, सारस साळवी, प्रकाश आव्‍हाळ, मनोज भोकरे आणि त्यांच्या पथकाने या पसार आरोपींना नाना पेठेतून पकडले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अक्षय बोंबाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. गळ्यावर २ टाके तर छातीवर दोन टाके पडले आहेत. तर त्यांच्या डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक विनोद सलगरकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT