PMC Abhay Yojana Controversy: Pudhari
पुणे

Pune Property Tax Abhay Scheme: मिळकतकर ‘अभय योजना’ संपण्यास दोनच दिवस; 75% व्याज सवलतीची शेवटची संधी

महापालिकेचा इशारा – 188 मिळकती सील; 14-15 फेब्रुवारीपर्यंत केंद्रे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मिळकत कराची थकीत रक्कम 75 टक्के सवलतीत भरण्यासाठी महापालिकेने राबवलेली ‌’अभय योजना‌’ संपण्यास केवळ दोन दिवस उरले आहे. 14 आणि 15 फेबुवारी हे दोनच दिवस शिल्लक राहिले असून, थकबाकीदारांनी लवकरात लवकर कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेमार्फत ही योजना प्रथम 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत राबविण्यात आली होती. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या योजनेला 16 जानेवारी ते 15 फेबुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली असली, तरी अनेक मिळकतकर थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा केलेला नाही.

दरम्यान, करवसुलीसाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या प्रकरण 8 करधान नियम 42 नुसार मिळकतींची अटकवणी (सील) करण्याची कारवाई सुरू असून तब्बल 188 मिळकती सील करण्यात आल्या आहेत. थकबाकी कायम ठेवल्यास पुढील काळातही अशीच कारवाई अधिक तीव करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

अभय योजनेच्या माध्यमातून व्याजावरील मोठी सवलत मिळत असताना स्वयंस्फूर्तीने थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे. योजना संपण्यास अवघे दोन दिवस उरले असल्याने थकबाकीदारांसाठी ही शेवटची सुवर्णसंधी असल्याचेही महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे.

करभरणा केंद्र 14 आणि 15 तारखेला रात्री 8 पर्यंत राहणार सुरू

नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे 14 आणि 15 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष केंद्रांवर जाऊन कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अभय योजनेअंतर्गत जमा झालेला कर

  • अभय योजनेचा लाभ घेतलेले मिळकत संख्या 1,32,771

  • वसूल रक्कम 780,10,88,288

  • अभय योजनेचा लाभ न घेतलेल्या मिळकती 15,701

  • वसूल रक्कम 91,88,05,785

  • अभय योजनेचा लाभ न घेतलेली मिळकत संख्या 15701

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT