

परिंचे: श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या यात्रा सोहळ्याची सांगता गुरुवारी (दि. 12) पारंपरिक रंगशिंपणाने झाली. गेली बारा दिवस वीर येथे श्रीनाथांचा यात्रा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या यात्रा उत्सवाला मानकरी राऊत यांच्या हळदीने सुरुवात झाली. त्यानंतर देवाचे लग्न, पान पूजन, भाकणूक, रंगशिंपण (मारामारी) हे कार्यक्रम उत्साहात पार पडले. उत्सवाच्या 12 दिवसांमध्ये श्रीनाथांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदी विविध राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इंग्लंडमधील काही भाविक भक्त श्रीक्षेत्र वीर येथे रेड फेस्टिवल अनुभवण्यासाठी आले होते. सर्व भाविक भक्त गुलाल खोबरे उधळून श्रीनाथांचा जयघोष करत होते.
रंगशिंपण सोहळ्यानिमित्त गुरुवारी कोडीतची मानाची पालखी देऊळवाड्यात आली. त्या पाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोंडवेवाडी, राजेवाडी, कसबा, पुणे या सर्व मानाच्या पालख्या, काठ्या ढोल-ताशांच्या गजरात निशाण, छत्री, अब्दागिरी, दागिनदार सर्व लवाजम्यासह देऊळवाड्यात दाखल झाल्या. मंदिरात दादा बुरुंगले व तात्या बुरुंगले यांच्या भाकणुकीचा कार्यक्रम होऊन दीड वाजता देवाचे मानकरी राऊत यांचे भाचे मानकरी जमदाडे यांचेमार्फत रंगाचे शिंपण करण्यात आले. या वेळी देवाचा शिंपडलेला रंग अंगावर घेण्यासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. देवाच्या या रंगशिंपणाच्या सोहळ्याला भाविकांचा जनसागर उसळला होता.
गुरुवारी सकाळपासूनच दर्शन बारी, वाहनतळ तसेच मंदिरातील सर्व विधी वेळेत पूर्ण करण्याबाबत देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळ व्यवस्था पाहत होते. सोबतच महसूल, पोलिस प्रशासन, कमांडो, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी व पीएमपी कर्मचारी, होमगार्ड, पोलिस मित्र, गावातील श्रीनाथ सेवेकरी यांनी आपली सेवा बजावली. यात्रा समाप्तीच्या आदल्या दिवशी उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर व सासवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी यात्रेच्या गर्दीबाबत विश्वस्त मंडळांसोबत बैठक घेत विविध सूचना केल्या.
श्रीक्षेत्र वीर येथील यात्रा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, यात्रा नियोजन व समितीचे सदस्य तसेच वीरचे सरपंच, ग््राामसेवक, ग््राामस्थ, प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
मोहनराव रावसाहेब धुमाळ मुख्य विश्वस्त, देवस्थान ट्रस्ट.