Electricity Cable Pudhari
पुणे

Pune Cable Fault Heatwave: पुण्यात उष्म्याने वीज केबल्स वितळल्या; कोंढव्यात 16 तास वीजपुरवठा खंडित

वाढत्या वीज मागणीचा परिणाम; पुणे परिमंडळात दोन दिवसांत सात ठिकाणी केबल फॉल्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विजेच्या वाढत्या मागणीमुळे गरम होणाऱ्या केबल्स आणि आग ओकणाऱ्या सूर्यामुळे केबल्स वितळून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले असून, गेल्या दोन दिवसांत पुणे परिमंडळातील वीज कर्मचाऱ्यांना तब्बल सात ठिकाणी केबलची दुरुस्ती करावी लागली आहे. कोंढव्यातील दुरुस्तीला विलंब झाल्याने या परिसरातील रहिवाशांना तब्बल 16 तास विजेविना अंधारात काढावे लागले.

उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात विजेची मागणी नेहमीच वाढते. पुणे परिमंडळातील वीज मागणी आता चार ते साडेचार हजार मेगावॅटवर गेली असून, मासिक वीजवापरही 1700 दशलक्ष युनिटवर पोहोचला आहे. विजेची मागणी वाढल्यामुळे वीजवहन करणाऱ्या ॲल्युमिनियमच्या वा कॉपरच्या तारांमध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यावरील रबर-प्लास्टिकचे आवरण तापते. त्या जोडीला वाढत्या तापमानाचाही त्यावर परिणाम होऊन कमकुवत झालेल्या ठिकाणी केबल बर्स्ट होतात किंवा अनेकदा जॉईंटवर त्या तुटतात, त्यामुळे उन्हाळ्यात केबल फॉल्टमध्ये वाढ होते, असे महावितरण कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पुणे परिमंडळातील पिंपरी, भोसरी, बाणेर, कोथरूड आणि कोंढवा येथे केबल फॉल्ट झाल्याची नोंद महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रात केली आहे. कोथरूड येथे सोमवारी रात्री दोन ठिकाणी असे केबल फॉल्ट आले होते. बहुतेक ठिकाणी केबलमध्ये निर्माण झालेले हे बिघाड तीन-चार तासांतच दूर करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. कोथरूड येथे सोमवारी सकाळपासूनच विजेचा लपंडाव सुरू होता. कोथरूडमधील मयूर कॉलनी, कर्वे पुतळा परिसरात दुपारी तीन सव्वातीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. एक-दीड तासाने तो पूर्ववत झाला. परंतु, रात्री आठच्या सुमारास पुन्हा या परिसरात अंधार पसरला.

केबलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यास रात्रीचे अकरा वाजले. अकराच्या सुमारास सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे महावितरण कोथरूडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विष्णू माने यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. भोसरीमध्ये वीजवहन केबल्समध्ये पक्षी अडकल्याने बिघाड निर्माण झाला होता, तर पिंपरी व बाणेर परिसरात तापलेल्या केबल्स वितळल्याने केबल फॉल्ट निर्माण झाला होता, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोंढवा परिसरात झालेला केबल फॉल्ट शोधण्यास थोडा विलंब लागला. त्यानंतर ते दुरुस्त करणारे पथक पोहोचण्यासही उशीर झाला. त्यामुळे तेथील दुरुस्तीस वेळ लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे परिमंडळातील वीजवापर

उन्हाळ्यातील दोन महिन्यांचा (एप्रिल व मे) अपवाद वगळता पुणे परिमंडळातील ग््रााहकांचा मासिक वीजवापर 1600 ते 1700 दशलक्ष युनिटच्या दरम्यान असतो. परंतु, एप्रिल व मे मध्ये तो 1700 दशलक्ष युनिटहून अधिक होतो. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली की केबल फॉल्ट वाढतात, असा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे.

विजेसंबंधीच्या तक्रारींसाठी संपर्क...

विजेसंबंधीच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी 1912, 18002333435, 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. महावितरणच्या मोबाईल ॲपवरही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT