

पुणे: शहरातील बिघडत्या हवेच्या गुणवत्तेमुळे आता महापालिकेने प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. लाकूड आणि कोळशाचा वापर करून व्यवसाय चालविणाऱ्या 30 हून अधिक बेकरी, तंदूर केंद्रे आणि इतर व्यावसायिक भट्ट्यांना पर्यावरण विभागाने नोटिसा बजावल्या.
15 दिवसांत गॅस किंवा विजेवर आधारित पर्यावरणपूरक स्वच्छ इंधनाकडे वळण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करून व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या पाहणीत शहरातील काही पारंपरिक भट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर आणि प्रदूषक घटक हवेत मिसळत असल्याचे समोर आले आहे.
विशेषतः बेकरी आणि तंदूर व्यवसायातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांमुळे शहराच्या वायूगुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ‘पुणेकरांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही. हवा प्रदूषण वाढविणाऱ्या घटकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील,’ असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
याशिवाय, बांधकाम प्रकल्पांमधून होणाऱ्या धूळप्रदूषणावरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. तसेच पर्यावरण विभागाच्या उपायुक्त किशोरी तोरडमल-शिंदे यांच्या स्वाक्षरीने नोटिसा जारी केल्या आहेत.
अचानक तपासण्या; नियम मोडल्यास गुन्हे
महापालिकेची विशेष पथके पुढील काही दिवसांत अचानक तपासण्या करणार आहेत. त्या वेळी लाकूड किंवा कोळशाचा वापर सुरू असल्याचे आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981 अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. गरज पडल्यास संबंधित आस्थापनांचे परवानेही रद्द केले जाऊ शकतात.