पुणे : फ्लेक्स असो वा बेकायदा बांधकामे त्यांच्यावर बुलडोझर पद्धतीने नेहमी कारवाई करणाऱ्या महापालिकेने राजकीय पक्षांच्या बाबतीत मात्र नरमाईचे धोरण स्वीकारले असून, राजकीय फ्लेक्सवर कारवाई करण्यापूर्वी ते काढण्याची हात जोडून विनंती महापालिका प्रशासनाने केली आहे.
फ्लेक्सची नियमावली सांगण्यासाठी महापालिका सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवणार असून, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची आठवण करून दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरात माजी नगरसेवकांनी त्यांनी केलेल्या कामाचे तर नव्या इच्छुकांनी मतदार राजाला प्रलोभने दाखवणारी विविध मोठे फ्लेक्स शहरात जागोजागी लावली आहेत. हे सर्व फ्लेक्स अनधिकृत असूनही त्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची प्रभावी मोहीम हाती घेतली होती.
मात्र ही कारवाई केवळ दिखावा ठरली आहे. कारवाई करताना राजकीय व्यक्तींना वगळले जात आहे. केवळ व्यावसायिक फ्लेक्सवर गुन्हे दाखल करून धुळफेक करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून केले जात आहे.
शहरातील रस्त्यांवरील विद्युत खांब, पथ दिवे, सिग्नलचे खांब, चौकांसह सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभारले जातात. हे फ्लेक्स विविध कार्यक्रमांचे आयोजन, वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा यासाठी लावले जातात. अनेक ठिकाणी हे फ्लेक्स धोकादायक पद्धतीने उभारले जातात. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होतेच शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून फ्लेक्सबाजी केली जात आहे. अनधिकृत फ्लेक्सच्या एकूण संख्येत सर्वाधिक प्रमाण राजकीय फ्लेक्सचे असते. असे असतानाही राजकीय फ्लेक्सबाजांना प्रशासनाकडून अभय दिला जात आहे.
महापालिकेने राजकीय फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व राजकीय पक्षांना फ्लेक्स लावू नये यासाठी पत्र दिले जाणार आहे. या पत्रात त्यांना सुप्रीम कोर्टाच्या नियमावलीची आठवण करून देत अनधिकृत फ्लेक्स लावू नये याबाबत विनंती केली जाणार आहे. त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे फ्लेक्स जेसीबीने पाडणाऱ्या महापालिकेने राजकीय फ्लेक्सबाजीबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रशासन राजकीय पक्षांना पाठवणार पत्र : सुप्रीम कोर्टाच्या नियमांची करून देणार आठवण नव्या होर्डिंगला स्थगिती; नव्या दराबाबत लवकरच होणार निर्णय शहरात नवे होर्डींग लावण्यास स्थगिती देण्यात आली आहे. नवे दर लागू करण्यासाठी फ्लेक्सधारकांच्या असोसिएशनची बैठक घेतली जाणार आहे. जीआरनुसार जेवढा खर्च होर्डिंग लावण्यासाठी होतो त्याच्यानुसार दर घेण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या जुन्या दरासंदर्भात कोर्टात केस सुरू आहे. नव्या दराबाबत पुढील 10 ते 12 दिवसांत धोरण ठरवून दरनिश्चिती केली जाईल. त्याला पूर्वगणक समिती, स्थायी समिती व जीबीमध्ये मान्य करून त्यानुसार दर आकारणी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
मिशन मोडमध्ये कारवाई करणार शहरातील विविध फ्लेक्सवर कारवाई तीव केली जाईल. यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देणार आहे. सध्या निवडणूक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाईचा वेग कमी झाला आहे. राजकीय फ्लेक्स लावणाऱ्यांची नोंद ठेवून कारवाई केली जाणार आहे.पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.