Police Tourism During Investigation Pudhari
पुणे

Pune Police Action: तपासाच्या नावाखाली पोलिसांचा सातारा पर्यटनाचा प्रकार; महिला अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई

तक्रारदार महिलेला रात्री एकटी सोडल्याचा आरोप; अपर पोलिस आयुक्तांनी दोन वर्षे वेतनवाढ रोखली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तपासाच्या नावाखाली विश्रामबाग पोलिसांच्या सातारा पर्यटनाचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांना दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा दिली आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे, पोलिस हवालदार श्रीहरी पाटील, महिला पोलिस कर्मचारी कोमल कांबळे अशी तिघा पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार महिला आपल्या घरी आजारी व्यक्ती असून, मला लवकर घरी जायचे आहे असे वारंवार सांगत असताना देखील तिच्याकडे दुर्लक्ष करत या तिघा पोलिसांनी पर्टनाचा आनंद घेत शेवटी तिला मध्यरात्री १ वाजता घरी न सोडता नारायण पेठ पोलिस चौकी येथे सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर तक्रारदार महिलेने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असता, चौकशीत हा प्रकार पुढे आला आहे.

विश्रामबाग पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास नाईकवाडे यांच्याकडे होता. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी हे तिघे जण सातारा येथे तक्रारदार महिलेसह गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर नाईकवाडे यांनी स्थानिक पोलिस ठाण्यास कळवून त्यांची मदत घेऊन तपास करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे न करता तेथील एका प्रसिद्ध ढाब्यावर हजेरी लावली. त्यानंतर सव्वातीन वाजता ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. पंचनामा करण्यासाठी गेले असता आजूबाजूचे रहिवासी किंवा घटनास्थळावरील व्यक्तीकडे कोणताही तपास केला नाही.

खरे तर गुन्हाचा तपास पूर्ण केल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून पुण्यात परत येणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता साताऱ्याजवळील कासपठार व इतर प्रेक्षणीय स्थळांचा आनंद लुटला. तक्रारदार महिलेची आई आजारी असून, त्या एकट्याच घरी आहेत. त्यामुळे त्यांना घरी लवकर पोहोचणे आवश्यक असल्याचे त्या वारंवार पोलिसांना सांगत होत्या. मात्र, तरीदेखील या तिघांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी परत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी जेवण करून अखेर रात्री १ वाजता पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी तक्रारदार महिलेस सुरुवातीला स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिलेने विनंती केल्यानंतर त्यांना नारायण पेठ पोलिस चौकी येथे मध्यरात्री एकटीला सोडून दिले.

काय म्हटले आदेशात..?

महिला पोलिस उपनिरीक्षकांसह तिघांनी सातारा येथे जाऊन केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून तेथील पर्यटनस्थळे पाहण्यात दंग होते. तुम्ही सर्वांनी तक्रारदार यांना तपासासाठी घेऊन जाऊन त्यांच्या गुन्ह्याचा तपास न करता केवळ मैजमजा केली आहे. तुम्ही तुमच्या कर्तव्यात अत्यंत बेजबाबदार, बेशिस्त, निष्काळजीपणाचे वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन होईल असे कृत्य, वर्तन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT