पुणे: पुणे पोलिसांच्या परिमंडल पाचच्या हद्दीतून गहाळ झालेले १७१ मोबाईल तक्रारदारांना नुकतेच परत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
शहराच्या गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरीला जाणे तसेच गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडल पाचच्या हद्दीतील नऊ पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते तसेच काही जणांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पुणे पोलिसांच्या 'लाॅस्ट अँड फाउंड' पोर्टलवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात हे मोबाऊल संच दुसरे सीम कार्ड घालून वापरत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मोबाऊल संच वापरणाऱ्यांशी संपर्क साधला आणि हे संच परत करण्याच्या सूचना दिल्या. मोबाऊल परत न दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. चोरीचे मोबाऊल विकत घेऊन वापरणे हा गुन्हा असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे १७१ मोबाईल जमा करण्यात आले. मोबाईल तक्रारदारांना परत करण्यासाठी हडपसर भागातील एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
परिमंडल पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले. या वेळी पोलिस उपायुक्त डाॅ. शिंदे यांनी मोबाईल शोधण्यासाठी वापरलेल्या तांत्रिक तपासाची माहिती तक्रारदारांना दिली. मोबाऊल वापरणे हे अविभाज्य भाग आहे. एखाद्या व्यकीचा मोबाईल संच हरविल्यानंतर तो अस्वस्थ असतो. मोबाईलमधील माहिती, छायाचित्रांशी त्याचे भावनिक नाते असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी पोलिस सदैव तत्पर असतात, असे डाॅ. शिंदे यांनी नमूद केले.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. उपनिरीक्षक शंभूराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, पोलिस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अल्ताफ शेख, पोलिस कर्मचारी संदीप राठोड, समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर यांनी ही कामगिरी केली.
पोलिसांकडून मिळालेली अनोखी भेट
मोबाईल हरविल्यानंतर आम्ही अस्वस्थ झालाे होतो. मोबाईल परत मिळेल की नाही, याची खात्री नव्हती. मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती होती. पोलिसांनी मोबाईल शोधले, याचे कौतुक वाटते. पोलिसांनी दिलेली ही अनोखी भेट आहे, अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली.