

खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या 18 नगरसेवकपदासाठी एकूण 58 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप असे मिळून 44 पक्षीय तर 14 अपक्ष उमेदवार आहेत. नगराध्यक्षपदासाठी 1 माघार झाल्याने 5 उमेदवार रिंगणात आहेत. किरण आहेर (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), शिवाजी मांदळे (भाजप), मंगेश गुंडाळ (शिवसेना एकनाथ शिंदे), बापू थिगळे (शिवसेना उबाठा) आणि एक अपक्ष असे 5 उमेदवार आहेत.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शुक्रवारी (दि. 21) माघारी नंतर 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 10 मधून सुप्रिया राहुल पिंगळे (शिवसेना), प्रभाग क्रमांक 3 मधून अनिरुद्ध दीपक सांडभोर (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची बिनविरोध निवड झाली तर प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेवर किशोर संभाजी थिगळे यांचा एकमेव अर्ज राहिला असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शुक्रवारपर्यंत नगरसेवकपदाच्या 40 जणांनी अर्ज मागे घेतले, त्यात अपक्षांबरोबरच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तीनही पक्षांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी आपापले उमेदवार प्रभागांमध्ये उभे केले आहेत.
शिवसेना 18 (पैकी एक बिनविरोध, एक माघार), राष्ट्रवादी काँग्रेस 16 (एक बिनविरोध) आणि भाजप 13 असे 44 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवार देखील रिंगणात असून, निवडणूक चुरशीची होणार आहे.