पुणे: परकीय चलनाची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाच्या चेहऱ्यावर ‘पेपर स्प्रे’ मारून भारतीय रुपयासह मलेशियाचे ‘रिंगिट’ आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) ‘दिराम’ चलन अशी एकूण 25 लाख 90 हजार रुपये असलेली बॅग हिसकावून फरार झालेल्या पाच जणांना सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
करण भगवान कोंढाळकर, यश भगवान कोंढाळकर, ऋतुराज शिवाजी गोरे (तिघे रा. गजानन कॉलनी, आंबेगाव पठार), युवराज गणेश वैराट (रा. सहकारनगर, पद्मावती), जुनेद जमील शेख (रा. दत्तनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना 6 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, आरोपींचा अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतला आहे. त्यांच्याकडून चोरीची रोख रोकड मलेशियन ’रिंगिट’ चलन जप्त केले आहे.
दरम्यान, आरोपी वैराट हा व्यावसायिकाचा कर्मचारी आहे. कर्जबाजारी झाल्याने त्याने मित्रांना सोबत घेऊन लुटल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. याबाबत धनकवडी येथील 47 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना 25 मे रोजी सकाळी सव्वानऊ वाजता धनकवडी पोस्ट कार्यालय रस्त्यावरील दूर्वांकुर कार्यालयाजवळ घडली. फिर्यादी परकीय चलनाची देवाणघेवाण करतात. आरोपी युवराज गणेश वैराट त्यांच्या कार्यालयात काम करतो. त्याने कर्जबाजारी झाल्याने मित्रांसोबत संगनमत करून फिर्यादींना लुटण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी सकाळी फिर्यादी परकीय चलनांच्या व्यवहारातून मिळालेले 25 लाख 90 हजार रुपये असलेली बॅग घेऊन दुचाकीवरून कार्यालयात निघाले होते. त्या वेळी अल्पवयीन मुलासह अन्य तीन आरोपींनी दोन दुचाकींवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. संधी मिळताच आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीला धडकवून अपघात झाल्याचा कांगावा करीत राडा घातला. त्याचवेळी अन्य साथीदार आरोपीने फिर्यादींच्या डोळ्यांत मिरचीचा स्प्रे मारून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला.
असे अडकले जाळ्यात
व्यावसायिकाला लुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलगा या बॅगेतील काही पैसे काढून खर्च करण्यासाठी आंबेगाव पठार परिसरात आला. त्याच्याकडे रोख रकमेसह परदेशी चलन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे परदेशी चलन सापडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल पवार, उपनिरीक्षक गणेश कर्चे यांच्या पथकाने केली.