पुणे: पुणे पोलिसांच्या परिमंडळ-४ अंतर्गत झोन-७ मध्ये सुरू असलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी गुटखा तस्करी आणि मटका जुगाराविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ७ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध धंद्यांमागील मुख्य सूत्रधारांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पहिली कारवाई लोहगाव पोलिसांनी खेसे पार्क परिसरात केली. संशयित ऑटोरिक्षाची तपासणी केली असता, त्यामध्ये २ लाख ४५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखू आढळून आला.
तस्करीसाठी वापरण्यात आलेली १ लाख ५० हजार रुपयांची ऑटोरिक्षा देखील जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२) याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत खराडी पोलिसांनी सेन्सर आयटी टॉवरजवळील मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चार मटका चालक आणि सात ग्राहकांसह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळा वरून ५३ हजार ४३० रुपये रोख, मटका पर्च्या, दोन ऑटोरिक्षा आणि १२ मोबाईल फोन जप्त केले. या कारवाईतही ३ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.