

वाल्हे: वारी संगे चालताना, मुखी यावे रामनाम | काम होता विठ्ठल, मिळे समाधान|| या अभंगातील भावार्थ प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो तो आषाढी वारीत. 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या अखंड जयघोषात लाखो वारकरी विठ्ठलभक्तीने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना त्यांच्या सोबत अनेक छोटे-मोठे व्यावसायिकही आपला संसाराचा गाडा हाकत चाललेले दिसतात. भक्ती, सेवा आणि उदरनिर्वाह यांचा सुंदर संगम वारीत अनुभवायला मिळत आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे (ता. पुरंदर) येथून निरा दिशेने मार्गस्थ झाला असून, या सोहळ्यासोबत विविध व्यावसायिकही चालत आहेत. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या वारीत वारकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय फुलतात.
पान-फुले विक्रेते, गंध लावणारे, मोबाईल चार्जिंगची सुविधा देणारे, चप्पल विक्री व दुरुस्ती करणारे, चहा-नाश्ता व पाणी विक्रेते, बॅग व चेन दुरुस्ती करणारे, केस कर्तनालय, मसाजसेवा, खेळणी, शीतपेये, चणे-फुटाणे तसेच विविध किरकोळ वस्तू विकणारे व्यावसायिक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज असतात.
शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य तसेच श्रीमंत अशा सर्व स्तरांतील वारकरी वारीत सहभागी होत असल्याने या व्यावसायिकांनाही मोठी संधी उपलब्ध होते. अनेक कुटुंबे पती-पत्नींसह विठ्ठलनामाचा गजर करत व्यवसायही सांभाळतात.
भक्ती आणि व्यवसाय यांचा समतोल साधत ते पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे वारीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असून, अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागतो.
पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी दाढी-केस कर्तनालय, चहा-नाश्ता, किरकोळ साहित्य, पूजा साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंना विशेष मागणी असते. वारकऱ्यांची सेवा करत व्यवसाय करण्याची ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, त्यातून भक्तीबरोबरच रोजगारालाही चालना मिळत आहे.
वाल्हे येथे पालखीचा एक दिवस मुक्काम असल्याने गावासह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले. वारकऱ्यांची गर्दी, सेवाभावी उपक्रम आणि व्यावसायिकांची लगबग यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला.
कामातही दिसतो विठ्ठल संतांनी दिलेल्या शिकवणीनुसार परमार्थासोबतच आपल्या कामातही भगवंत पाहण्याचा विचार आम्ही आचरणात आणत आहोत. गेली ६ वर्षे आम्ही वारीसोबत विविध किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करतो. माझ्या कुटुंबातील सर्व जण या सेवेत सहभागी होतात. यामुळे भगवंताची सेवा करण्याबरोबरच उदरनिर्वाहही होतो आणि वारकरी तसेच ग्राहकांची सेवा केल्याचे समाधान मिळते.
- रोहिणी कोल्हे, किरकोळ वस्तू विक्रेते (रा. बुलडाणा)