पुणे: रात्रपाळी कर्तव्यावर असलेल्या तीन पोलिसांनी आयटी अभियंता तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन तरुणाला मारहाण करीत फोन पेद्वारे पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, वाघोली पोलिसांचा ‘रात्रीस खेळ चाले’चा हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर पडताच त्यांनी तत्काळ या तिघा पोलिसांना निलंबित केले आहे.
पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे, अशी या पोलिसांची नावे आहेत. परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अब्दागिरे, खाडे आणि कांबळे हे तिघे वाघोली पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. 2 एप्रिल रोजी खाडे आणि कांबळे हे दोघे वाघोली गावठाण बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून कॉल मिळाला.
वाघोलीतील एका सोसायटीत काही मुले रूमवर राहतात आणि मुली आणून व्हिडीओ तयार करतात. त्यानुसार खाडे आणि कांबळे हे दोघे त्या सोसायटीत पोहचले. तेथील एका 24 वर्षीय तरुणाला घेऊन हे दोघे पोलिस ठाण्यात आले. त्या रात्री ठाणे अंमलदार म्हणून अब्दागिरे कर्तव्यावर होते. कॉलच्या अनुषंगाने जर असा काही प्रकार होता, तर योग्य ती कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, या तिघांनी अशी कोणतीच कारवाई केली नाही.
अब्दागिरेने धमकावले, खाडेने कानशिलात लगावली
अब्दागिरे याने तरुण-तरुणीला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो, तुमची नोकरी घालवतो, नातेवाइकांना बोलावून घेतो, अशा धमक्या दिल्या. तर, खाडेने तरुणाला हाताने चापटी मारल्या. कांबळेने तरुणाच्या मैत्रिणीला पोलिस ठाण्यात ताटकळत उभे ठेवले. हा प्रकार मिटवून घेण्यासाठी या तिघा पोलिसांनी मिळून तरुणाकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. खाडेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेला एक स्कॅनर तरुणाला दाखविला. तो ओंकार ऑटो गॅरेज नावाने होता. त्यावर फोन पे-द्वारे दहा हजार रुपये घेतले.
पोलिसांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने आयुक्तांकडे तक्रार
तक्रारदार तरुणाला पोलिसांच्या वर्तनाबद्दल संशय आला. नंतर त्याने या प्रकाराबाबत सविस्तर चौकशी केली. त्या वेळी तिघा पोलिसांनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर या दोघा आयटी अभियंता तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार केली. प्राथमिक चौकशीत या तिघा पोलिसांचा रात्रीचा कारनामा समोर आला.