

घोडेगाव: पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत दुचाकी चोराला स्थानिक गुन्हे शाखा आणि घोडेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चार दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राहुल अशोक दाते (वय २५, रा. मंचर) असे या आरोपीचे नाव आहे. मंचर, घोडेगाव, नारायणगाव आणि ओतूर परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. तपास पथकाने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सर्व चोरीच्या ठिकाणी एकच व्यक्ती संशयास्पद रित्या वावरताना दिसून आली.
गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांनासीसीटीव्हीतील चोरटा राहुल दाते असल्याची माहिती मिळाली. तो चोरीच्या गाड्या घोडेगाव येथील नारोडी फाटा येथे विक्रिसाठी येणार असल्याची माहिती मिळली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घोडेगाव, मंचर, नारायणगाव, ओतूर परिसरातील दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासासाठी घोडेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास सुरू आहे.