Pune Police Constable Koyta Attack: पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलीस शिपायावर गांजा सेवन करणाऱ्या टोळक्याने धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपाई अक्षय बांबल गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रेल्वे रुळांजवळ काही जण गांजा सेवन करत असल्याचे पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या निदर्शनास आले. ड्युटीवर असलेल्या बांबल यांनी संबंधित तरुणांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्यावरून वाद निर्माण झाला.
परिस्थिती चिघळल्यानंतर संबंधित टोळक्याने अक्षय बांबल यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींपैकी एकाने धारदार कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात बांबल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिस कर्मचाऱ्यावरच अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच ड्युटी बजावताना हल्ल्याला सामोरे जावे लागत असल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते आणि आतापर्यंत किती आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.
पुण्यात यापूर्वीही कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याने या प्रकरणाकडे पोलिस प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.