बैठकीस उपस्थित असलेले मान्यवर 
पुणे

शाळा, महाविद्यालय परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी घेतली बैठक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील विविध शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच अनोळखी व्यक्तीला शाळा, महाविद्यालयांच्या आवारात प्रवेश देण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी शाळा महाविद्यालयातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्यांना सूचना दिल्या. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील शिक्षण संस्थांचे चालक, प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस पोलीस आयुक्तालयात परिमंडळ एक मधील शाळा, महाविद्यालयांचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमावली सादर करण्यात आली. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

शाळा, महाविद्यालयांच्या आवारात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. कॅमेर्‍यांनी केलेले चित्रीकरण वर्षभर साठविण्याची सुविधा असावी. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारात नोंदणी पुस्तिका ठेवावी. बाहेरून येणार्‍या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकाची नोंद करून त्याला संस्थेच्या आवारात प्रवेश देण्यात यावा. शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत संस्थेतील कर्मचारी, शिक्षक, सेवक वर्गाने प्रवेशद्वारावर उपस्थित रहावे, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

सुरक्षा रक्षक नेमतानाही काळजी घेण्याच्या सुचना

संस्थेच्या आवारात शक्यतो सेवानिवृत्त सैनिकांना सुरक्षारक्षक म्हणून नेमावे. सुरक्षारक्षक नेमताना त्याची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा परवाना, आधारकार्ड, चारित्र्य पडताळणीची प्रत जमा करावी. जे विद्यार्थी पालकांबरोबर जातात. त्यांचे पालक शाळेत येईपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील सेवकवर्गाने थांबणे गरजेचे आहे. शाळेतील स्वच्छतागृहाच्या परिसरात कॅमेरे बसविण्याबाबतही यावेळी सुचना करण्यात आल्या.

अडचण असल्यास पोलिस काका, दिदींची मदत घ्या

शाळेतील संरक्षक भिंत उंच असावी. सुरक्षा उपाययोजनेबाबत नियमित बैठका घेण्यात याव्यात तसेच पोलिसांशी नियमित संपर्क साधावा. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पोलीस काका, पोलीस दीदी यांचे मोबाइल क्रमांक चिटकावेत. या क्रमांकावर कोणतीही अडचण आल्यास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या बैठकीस विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील माने, फरासखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT