Pune US Citizens Religious Conversion Case Pudhari
पुणे

Pune Crime: पुण्यात तीन अमेरिकन नागरिकांविरोधात कारवाई; पर्यटन व्हिसावर येऊन धर्मप्रचार केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Pune US Citizens Religious Conversion Case: पुण्यात पर्यटन व्हिसावर आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांविरोधात धर्मप्रचार केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. एका कॅब चालकाला धर्मांतरासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवल्याचा आरोप आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune US Citizens Religious Conversion Case: पुण्यात पर्यटन व्हिसावर भारतात आलेल्या तीन अमेरिकन नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याचा आणि एका कॅब चालकाला धर्मांतरासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तिन्ही नागरिकांना देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे.

या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पर्यटन व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हालचाली आणि नियमांचे पालन याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

कॅब चालकाच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अमेरिकन नागरिक पुण्यात पर्यटनाच्या उद्देशाने आले होते. मात्र शहरात राहत असताना ते ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका कॅब चालकाने पोलिसांकडे तक्रार करत दावा केला की, या परदेशी नागरिकांनी त्याला धर्मांतर करण्यासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी सुरू केली. तपासादरम्यान संबंधित तिन्ही नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात धार्मिक प्रचारासाठी वापरले जाणारे पत्रक आणि लीफलेट आढळून आल्याचं सांगितलं जात आहे.

पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन?

प्राथमिक चौकशीत या तिन्ही नागरिकांनी पर्यटन व्हिसावर भारतात प्रवेश केल्याचं समोर आलं. भारतात पर्यटन व्हिसावर आलेल्या परदेशी नागरिकांना धार्मिक प्रचार किंवा मिशनरी स्वरूपाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास परवानगी नसते. त्यामुळे या प्रकरणात व्हिसा नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलिस काय म्हणाले?

संदीप भाजीभाकरे, पोलिस उपआयुक्त (विशेष शाखा) यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, संबंधित तिन्ही अमेरिकन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर त्यांना भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT