PMPML Dash Camera System Pudhari
पुणे

PMPML Dash Camera System: पीएमपीच्या नव्या १ हजार सीएनजी बसमध्ये डॅश कॅमेरे! अपघातांचे कारण शोधणे होणार सोपे

फुटेजमध्ये छेडछाड किंवा डिलीट करणे अशक्य; अपघाताची माहिती तत्काळ कंट्रोल रूमपर्यंत पोहोचण्यास मदत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या १ हजार नव्या सीएनजी बसमध्ये आता अत्याधुनिक ‘डॅश कॅमेरा’ प्रणाली असणार आहे.

या कॅमेऱ्यांमुळे बसच्या अपघातांची अचूक कारणे स्पष्ट होण्यास आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत होणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

सध्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात सुमारे २ हजारांच्या घरात साध्या व वातानुकूलित बस धावत आहेत. मात्र, सध्याच्या बसमध्ये डॅश कॅमेरा प्रणाली उपलब्ध नाही. आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या १ हजार नव्या सीएनजी गाड्यांमध्ये ही यंत्रणा प्राधान्याने बसवली जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे फक्त अपघातांची कारणेच शोधता येणार नाहीत, तर भविष्यात पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थेत कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे, याचा वस्तुनिष्ठ डेटा प्रशासनाला मिळणार आहे.

छेडछाड अशक्य; कंट्रोल रूमला लगेच मिळणार माहिती

या डॅश कॅमेरा प्रणालीची वैशिष्ट्ये सांगताना आव्हाड म्हणाले, की दुर्दैवाने अपघात झाल्यास अथवा कॅमेरा नादुरुस्त/पडझड झाल्यासही त्यातील व्हिडिओ चित्रीकरण सुरक्षित (सेव्ह) राहील. या फुटेजमध्ये कोणालाही छेडछाड किंवा डिलीट करता येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत माहिती उपलब्ध होतील. यामुळे अपघातानंतरची कायदेशीर प्रक्रिया, चौकशी आणि पुढील योग्य कार्यवाही करणे पीएमपी प्रशासनाला अधिक सोपे आणि जलद होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT