पुणे

Pune Pmp News : पीएमपीला अकरा दिवसांत ‘युपीआय’वर पावणेआठ लाख

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने नुकत्याच सुरू केलेल्या 'युपीआय' तिकीट यंत्रणेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, प्रशासनाला ही यंत्रणा सुरू झाल्यापासून आतापर्यंत अवघ्या 11 दिवसांत 7 लाख 73 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, 35 हजार प्रवाशांनी या 'युपीआय'च्या 'क्युआर कोड'द्वारे तिकीट काढल्याची नोंद करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस पीएमपीच्या तिकीट यंत्रणेत प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी बदल केले जात आहेत. पूर्वी कागदी तिकीट वाटप यंत्रणा होती. त्यानंतर मशिनद्वारे तिकीट देण्याची यंत्रणा अमलात आली. मात्र, आता पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पुढाकार घेत, पीएमपीमध्ये 'क्युआर कोड'वर 'युपीआय'द्वारे तिकीट काढण्याची यंत्रणा प्रवाशांना उपलब्ध करून दिली.

वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद आणि तिकीट वाटपातील भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी 'युपीआय' यंत्रणा सुरू व्हावी, म्हणून दै.'पुढारी'कडून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा करण्यात आला होता. 'भाजीवाल्याकडे युपीआय, पीएमपीत का नाही' असा मथळा असलेले वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत सिंह यांनी ही यंत्रणा 1 ऑक्टोबरपासून सुरू केली. सुरुवातीला ही यंत्रणा राबविताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच, वाहकांनादेखील सुरुवातीला तांत्रिक अडचणी आल्या. आता मात्र, 'युपीआय' यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याचे पीएमपी अधिकार्‍यांनी सांगितले.

अकरा दिवसांतील अशी जमा झाली रक्कम

– दिनांक – युपीआयद्वारे रक्कम – व्यवहार – प्रवासी

1 – 45289 – 1670 – 2200

2 – 56541 – 2247 – 2783

3 – 48200 – 1978 – 2364

4 – 54730 – 2172 – 2554

5 – 59701 – 2418 – 2789

6 – 69183 – 2699 – 3229

7 – 75699 – 2774 – 3397

8 – 114421 – 3955 – 5313

9 – 87009 – 3477 – 4024

10 – 75470 – 2834 – 3290

11 – 86791 – 3301 – 3841

एकूण युपीआयद्वारे जमा रक्कम – 773026 रुपये

एकूण युपीआय ट्रान्झक्शन – 29525

एकूण प्रवासी संख्या – 35784

आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुट्ट्या पैशांमुळे वाहक आणि प्रवाशांमधील सातत्याने होणारे वाद थांबविण्यासाठी युपीआय यंत्रणा 1 तारखेपासून सुरू केली. या यंत्रणेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच सर्व तिकिटे प्रवासी युपीआयच्या माध्यमातून काढतील, असा विश्वास आहे.

– सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

हेही वाचा

SCROLL FOR NEXT