Pune Metro News : मेट्रो प्रवास सुखाचा, पण पार्किंगची मारामार | पुढारी

Pune Metro News : मेट्रो प्रवास सुखाचा, पण पार्किंगची मारामार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात मेट्रो रेल्वे वाहतूक सुरू झाली असली, तरी सर्व स्थानकांलगत वाहनतळ नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दोन्ही महानगरातील 30 स्थानकांपैकी सात ठिकाणीच वाहनतळ आहेत. उर्वरित ठिकाणी वाहने पार्किंग कुठे करावी, अशी असा प्रश्न नागरिकांना पडतो. महापालिका, वाहतूक पोलिसांनी तेथे जम्बो वाहनतळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शासनाने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात मेट्रो प्रकल्प उभारला आहे.

मात्र, मेट्रो स्थानकाच्या खाली दुचाकीस्वारांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मेट्रोऐवजी स्वत:चे वाहन वापरावे लागत आहे. बुधवारी दै.’पुढारी’च्या प्रतिनिधीने शहरात असलेल्या मेट्रो स्थानकाखालील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. त्या वेळी येथे असलेली सर्वच्या सर्व छोटेखानी पार्किंग फुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले. दुचाकी गाड्या पार्किंग करायला जागा मिळत नसल्यामुळे अनेक नागरिक मेट्रोने प्रवास करायची इच्छा असतानाही फक्त पार्किंग जागा नसल्यामुळे आपली दुचाकी घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाल्याचे दिसले.

प्रवासी म्हणाले…

प्रवासी राहुल शिंदे म्हणाले, ‘मला दररोज वनाज येथून मुंबईला डेक्कन रेल्वेने जावे लागते. त्यासाठी मी रोज सकाळी पुणे स्टेशनला जातो. तेथील पार्किंगला गाडी पार्क करतो आणि मी ट्रेनने मुंबईला जातो. मात्र, मला वनाज येथे गाडी पार्क करायला जागा मिळत नाही. जागा मिळाली तर मी पुणे स्टेशनला दुचाकी न नेताच थेट मेट्रोने जाईन. परिणामी, माझा इंधनाचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे वनाज मेट्रो स्टेशन येथे दुचाकींसाठी पुरेसे पार्किंग उपलब्ध करून द्यावे.’

इथे आढळली दुचाकी पार्किंग व्यवस्था

– वनाज – 20 दुचाकी , आनंदनगर – 15 , आयडियल कॉलनी – 0, नळस्टॉप – 20, गरवारे कॉलेज – 15, डेक्कन – 0, आरटीओ – 20 तर रुबी हॉल स्थानकाखाली 10 दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र, हे पार्किंग सकाळीच फुल्ल होत आहे. त्यामुळे दिवसभर येथे इतरांना पार्किंगला जागा मिळत नाही.

  • पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने अनेक नागरिक गाडी घेऊन परत जात होते.
  • मेट्रो स्थानकाखालील असलेली पार्किंगची छोटी जागा मेट्रो कर्मचार्‍यांच्याच दुचाकींनी फुल्ल झाले होते.
  • मेट्रोची छोटी पार्किंग फुल्ल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आपली वाहने पादचारी मार्गावर अस्ताव्यस्त लावली होती.

कोणत्या स्टेशनजवळ आहे पार्किंगसाठी जागा ?

  • पिंपरी-चिंचवड
  • संत तुकाराम महाराज स्टेशन
  • शिवाजीनगर
  • मंगळवार पेठ
  • सिव्हील कोर्ट
  • वनाज डेपो
  • स्वारगेट

मेट्रो स्थानकालगत वाहनतळ विकसित करण्याचा प्रयत्न महामेट्रो करत आहे. 7 ठिकाणी पार्किंग विकसित केले आहे. रेल्वेच्या पार्किंगसोबत करार केला आहे. पार्किंगसाठी आवश्यक जागांकरिता पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना पत्र पाठवण्यात आले आहे. आता आम्ही महापालिका प्रशासनाच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.

– हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

हेही वाचा

नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

Ayodhya Ram Temple : अयोध्येत २६ जानेवारीपासून भाविकांना दर्शन घेता येणार

आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार : प्रियांका गांधी-वधेरा

Back to top button