PMFME Pudhari
पुणे

Pune PMFME Scheme Buyer Seller Meet: पुणे जिल्ह्यात पीएमएफएमई योजनेतून 2.99 कोटींचे खरेदी करार

खरेदीदार-विक्रेता संमेलनात प्रक्रियादारांना मोठा प्रतिसाद; 35 टक्के अनुदानामुळे उद्योगांना चालना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जिल्ह्यातील पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (पीएमएफएमई) लाभ घेतलेल्या प्रक्रियादार, लाभार्थी यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना चांगली मागणी आहे. कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रक्रियादार विक्रेता शेतकरी व खरेदीदार संमेलनात घाऊक दरानुसार सुमारे 2 कोटी 99 लाख 47 हजार 800 रुपयांएवढे खरेदीचे करार झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक सहकार्याने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (पीएमएफएमई) लाभ घेतलेल्या प्रक्रियादार, लाभार्थी शेतकऱ्यांकडून उत्पादित कच्च्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात नुकतेच खरेदीदार-विक्रेता संमेलन पार पडले. त्यामध्ये हे करार झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पीएमएफएमई योजना सन 2020-21 पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेनुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग या योजनेतून खुला झाला आहे. अन्नप्रक्रिया योजनेतून बेरोजगार युवक-युवती, बचत गट, शेतकरी गट, संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. या योजनेमध्ये एकूण कर्जाच्या 35 टक्के अनुदान दिले जात असल्याने उद्योग उभारणीस मोठा आधार मिळत आहे.

असंघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगांना संघटित व नोंदणीकृत करणे तसेच प्रक्रिया केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेत सातबारा उतारा नसला तरीही लाभ घेता येऊ शकतो. योजना अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा संसाधन व्यक्तींची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. अर्जदारांना प्रस्ताव सादर करण्यापासून ते कर्जमंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाते तसेच त्यांचा प्रस्ताव विनामूल्य सादर करून दिला जातो.

दुग्धप्रकिया ते पल्प ज्यूसपर्यंतची उत्पादने...

जिल्ह्यात आत्तापर्यंत या योजनेत 1 हजार 431 प्रस्तावांचे कर्ज मंजूर झाले असून, ते उद्योग कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुग्ध प्रक्रिया उत्पादने, गूळप्रक्रिया, नमकीन पदार्थ, नाचणीचे पदार्थ, टोमॅटो उत्पादने, बिस्किट्‌‍स, मसाले, गापड, लोणचे, डाळ मिल, राईस मिल, गहू आटा तसेच फळांच्या पल्पपासून ज्यूस व पावडरनिर्मिती इत्यादी अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT