

मंचर: खवले मांजराच्या खवल्यांसह सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या टोळीवर आंबेगाव तालुक्यातील मंचर वन विभागाने कारवाई करीत दोघांना अटक केली. उदय शंकर सुर्वे (रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) व नवीन करीम खान (रा. वडवली, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वनपरिमंडळ मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर यांना सोमवारी (दि. 16) खवले मांजर व सांबर यांच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने मंचर येथील मोरडे फुड्स कंपनीजवळील झटका खानावळीच्या मागील परिसरात सापळा रचला.
दरम्यान, एमएच 04 डीव्हाय 3567 या क्रमांकाची कार संशयास्पदरीत्या येताना दिसताच पथकाने तिला अडविले. झडतीदरम्यान कारमधून सुमारे 3 किलो वजनाचे खवले मांजराचे खवले, तीन नखे तसेच सांबराची चार शिंगे जप्त करण्यात आली. कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून मंगळवारी (दि. 17) प्रथम वर्ग न्यायालय घोडेगाव येथे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
ही कारवाई पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकर व उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रीय उपवनसंरक्षक लोकेश पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले तसेच वनरक्षक रईस मोमीन, विवेक जगताप, शिवाजी ढोले, पूजा पवार, धकुली शिवशरण व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी-विक्री, साठवण किंवा वाहतुकीसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये कोणीही सहभागी होऊ नये. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.
विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी