पुणे: झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए या पुणे महानगर क्षेत्रातील पाण्याची गरज आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सन २०५१ पर्यंतची पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोत, संभाव्य पाणीटंचाई आणि पर्यायी जलस्रोतांचा अभ्यास करून दीर्घकालीन जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने अभ्यास गट स्थापन केला आहे.
पुणे महानगर प्रदेशात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, विविध नगरपालिका, औद्योगिक क्षेत्रे तसेच ग्रामीण भागांचा समावेश आहे. सध्या जलसंपदा विभागाच्या धरणांमधून या प्रदेशाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढती लोकसंख्या, औद्योगिक आणि व्यावसायिक विकास तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशाचा एकत्रित विचार करून पुढील २५ वर्षांचे जलनियोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट काम करणार असून, या अभ्यास गटात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांचे आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक, एमआयडीसीचे मुख्य अभियंता आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. जलसंपदा विभागाचे सोलापूर येथील मुख्य अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. शासनाने तीन महिन्यांत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या अभ्यासगटामार्फत सन २०३१, २०४१ आणि २०५१ या तीन टप्प्यांतील पाण्याची मागणी निश्चित केली जाणार आहे. घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, संस्थात्मक आणि बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण विचारात घेतले जाणार आहे. त्यानुसार उपलब्ध जलस्रोत आणि भविष्यातील मागणी यांची तुलना करून क्षेत्रनिहाय संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज घेतला जाईल. धरणे, जलाशय, नद्या आणि भूजलसाठ्यांची विश्वासार्ह उपलब्धता तसेच मंजूर पाणी आरक्षणांचाही आढावा घेतला जाणार आहे. याचसह नवीन जलस्रोत, जलसाठे, पाणीपुरवठा योजना आणि पुनर्वापर प्रकल्पांचे प्राधान्यक्रम निश्चित केले जातील. त्यासाठीचा अंदाजित खर्च, निधीची आवश्यकता, अंमलबजावणीचे वेळापत्रक आणि संबंधित विभागांची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाच्या उपसचिव सविता बोधेकर यांनी जारी केला आहे.
जलस्रोतांवरील परिणामही विचारात घेतला जाणार
प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे संधारण, भूजल पुनर्भरण आणि स्थानिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यांसारख्या पर्यायांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासली जाणार आहे. तसेच जलवाहिन्यांमधील गळती, जलमापन आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पाण्याची बचत कशी करता येईल, याचाही अभ्यास केला जाणार आहे. हवामानबदलामुळे पर्जन्यमानात होणारे संभाव्य बदल, दुष्काळ आणि अतिवृष्टीचा जलस्रोतांवरील परिणामही विचारात घेतला जाणार आहे.