

पुणे: सुरक्षेचे कारण पुढे करीत गुलटेकडी मार्केट यार्डातील अडत्यांनी गाळ्यांना लोखंडी जाळ्यांचे कुंपण घालण्याचा सपाटा लावला आहे. काहींनी दोन गाळ्यांमधील मार्ग बंद केले आहेत, तर काहींनी एकापेक्षा अधिक गाळे एकत्र करून संपूर्ण जागाच जाळीबंद केली आहे.
त्यामुळे शेतमाल खरेदीसाठी येणारे खरेदीदार आणि मालाची वाहतूक करणाऱ्या कष्टकऱ्यांना वळसा घालावा लागत आहे. गाळ्यांमध्ये अथवा त्यांच्या बाजूला बांधकाम करण्यास मनाई असतानाही अडत्यांची मनमानी सुरू आहे. मात्र, बाजार समिती प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप बाजार घटकांकडून होत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे आणि कांदा-बटाटा विभागात हा प्रकार प्रामुख्याने दिसून येत आहे. सुरुवातीला शेजारच्या गाळ्यांवरील शेतमाल आपल्या जागेत येऊ नये तसेच नागरिकांची ये-जा रोखण्यासाठी दोन गाळ्यांमध्ये जाळ्या बसविण्यात आल्या. त्यानंतर काही अडत्यांनी तर लगतचे गाळे एकत्र करून त्याभोवती लोखंडी जाळ्या उभारल्या आहेत.
त्यामुळे गाळ्यांमधील मोकळे मार्ग बंद झाले असून, बाजारातील दैनंदिन व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. मार्केट यार्डात शेतमालाची खरेदी-विक्री करताना खरेदीदार, हमाल आणि वाहतूकदारांची सतत वर्दळ असते. मात्र, जाळ्यांमुळे एका गाळ्यावरून दुसऱ्या गाळ्याकडे थेट जाणे शक्य होत नाही. मालाची चढ-उतार करतानाही कष्टकऱ्यांना अधिक अंतर पार करावे लागत आहे. अडत्यांच्या सुरक्षेसाठी इतर बाजार घटकांची गैरसोय का सहन करायची? असा सवाल उपस्थित होत आहे.
मार्केट यार्डात अनधिकृतपणे जाळ्या लावणाऱ्या अडतदारांना त्या हटविण्यासाठी नोटिसा बजाविण्यात येतील. दिलेल्या मुदतीत जाळ्या न हटविल्यास बाजार समिती प्रशासनाकडून थेट कारवाई करून त्या काढण्यात येतील. या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधित अडतदारांकडून वसूल करण्यात येईल. अनधिकृत जाळ्यांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
दिनेशसिंह चंदेल, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती