Pune Bike Taxi Protest: बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांचा बंद; रॅपिडोवर आजपासून कारवाईचे आश्वासन

१४ हून अधिक रिक्षा संघटना आंदोलनात सहभागी; आरटीओच्या आश्वासनानंतर धरणे आंदोलन तूर्तास स्थगित
Pune Bike Taxi Protest
Pune Bike Taxi ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेविरोधात शहरातील रिक्षा संघटनांनी सोमवारी (दि. २३) बंद पुकारून मंत्र्याच्या कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरले. दरम्यान, सायंकाळी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बाईक टॅक्सी व्यावसायिकांवर तातडीने कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे समितीने जाहीर केले.

Pune Bike Taxi Protest
Pune Market Yard Workers Protest: मार्केट यार्डात ५० किलो वजनमर्यादेचा पेच; ५ डिसेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा

बाईक टॅक्सी बंद करावी आणि त्याबाबतचे धोरणच रद्द करावे, या प्रमुख मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी सोमवारी एल्गार पुकारला. शहरातील सर्व प्रमुख रिक्षा संघटना या आंदोलनात उतरल्याने रस्त्यांवर रिक्षांचा शुकशुकाट जाणवला. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. पुणे जिल्हा रिक्षाचालक-मालक संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राज्य शासनाची भूमिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही काही कंपन्यांकडून खासगी दुचाकी वापरून बाईक टॅक्सी व्यवसाय सुरू असल्याचा आरोप कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Pune Bike Taxi Protest
Maharashtra Drought Water Shortage: राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाणीटंचाई निवारणाला निधीत प्राधान्य

बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल होऊनसुद्धा ही सेवा बिनबोभाट सुरू आहे. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांना तर गाड्यांचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. या कंपन्यांचे ॲप बंद करून संबंधितांना अटक करावी. रिक्षा व्यावसायिकांचे हितरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या परिवहनमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही समितीने या निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन प्रशासनाने सायंकाळी कृती समितीशी चर्चा करून मंगळवारपासून बाईक टॅक्सी व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. या आंदोलनात शिवनेरी, आम आदमी, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, मनसे, जनता गॅरेज, शिवाजीनगर, राष्ट्रवादी (शरद पवार गट), भाजप, एमआयएम, हिंदवी स्वराज्य आदी १४ हून अधिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

Pune Bike Taxi Protest
Shalarth System Correction: शिक्षकांच्या शालार्थ नोंदीत बदलासाठी नवी कार्यपद्धती; ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक

रिक्षा पंचायतची परिवहन राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने

रिक्षा पंचायत आणि मित्र संघटनांच्या वतीने परिवहन राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. सकाळी ११ वाजता बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडो रिक्षाचालक 'बाईक टॅक्सी गो बॅक'च्या घोषणा देत मिसाळ यांच्या कार्यालयावर गेले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार म्हणाले की, तरुणांना रोजगार देणे म्हणजे दुसऱ्याच्या ताटातील भाकरीचा तुकडा तोडून देणे नव्हे. हे धोरण रद्द करण्यासह रिक्षा व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. तसेच येत्या गुरुवारी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात बाबा शिंदे, भरत गेडेवाड, प्रकाश वाघमारे, उत्तम बनसोडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Pune Bike Taxi Protest
Ajit Pawar Plane Crash Inquiry: अजित पवार विमान अपघाताची घाई न करता पारदर्शक चौकशी करा; आशिष शेलार यांची भूमिका

तूर्त आंदोलन मागे; आजपासून होणार रॅपिडो बाईक टॅक्सीवर कारवाई

पुणे शहरातील बेकायदा बाईक टॅक्सीसेवेविरोधात सोमवारी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने रिक्षा व कॅबचालक-मालक सहभागी झाले होते. या आंदोलनातून चालकांमधील तीव्र नाराजी दिसून आली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत तसेच सायंकाळी ७ वाजता पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आरटीओ अर्चना गायकवाड यांनी मंगळवार म्हणजेच आजपासून रॅपिडोच्या बाईक टॅक्सीविरोधात कारवाई सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, येत्या बुधवारी

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीची वेळ कळविण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर तूर्तास आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीच्या अपेक्षेने घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी दिली.

रिक्षाचालकांनी नागरिकांना वेठीला धरू नये. आपल्या प्रश्नांबाबत भेट घेऊन चर्चा करावी, त्यांच्या मागण्यांची निश्चितच योग्य दखल घेतली जाईल.

प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.