महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने Pudhari
पुणे

Municipal Elections BJP vs NCP: महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने; महायुती फुटीचा फायदा महाविकास आघाडीस?

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये महायुती नव्हे, तर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची थेट स्पर्धा; मतविभाजनाचा फटका दिसण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील घटकपक्षांमध्येच निवडणुकीचा सामना लागणार आहे. त्यामुळे मनसेसह एकत्र आलेल्या महाविकास आघाडी महायुतीमधील फुटीचा किती फायदा उठविणार याबाबत आता उत्सुकता आहे. (Latest Pune News)

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा काही महापालिकांमध्ये महायुती न करता स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमात पत्रकारांशी औपचारिक बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने या दोन्ही महापालिकांमधील राष्ट्रवादी काँग्रेसकडील सत्ता खेचून आणत एकहाती सत्ता मिळविली होती. मात्र, त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच याबाबत स्पष्टता दिल्याने निवडणुकीच्या लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

2017 ला भाजपने सर्वाधिक 98 जागा जिंकल्या होत्या, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 41, शिवसेना व काँग्रेस प्रत्येकी 10, मनसे 2 आणि एमआयएम 1 अशा पद्धतीने नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतर समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी दोन सदस्यांचा एक प्रभाग करून त्यांची पोटनिवडणूक घेण्यात आली, त्यात एक जागा भाजपने तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती.

वरील आकडेवारी लक्षात घेता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हेच एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी पुन्हा आमने-सामने येणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने मतविभाजनाचा फायदा काही प्रमाणात भाजपला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे 2017 च्या निवडणुकीत मोदी लाट जोरात होती, भाजपची पाटी कोरी होती, त्याचा फायदा भाजपला मिळाला होता, आता मात्र, सत्तेत असल्यामुळे विरोधी वातावरणाचा (ॲन्टी इनकम्बन्सी) फटकाही भाजपाला बसू शकतो. त्यामुळे भाजप पुन्हा 100 चा आकडा पार करणार का? याबाबत संभम आहे.

महायुतीमधील आणखी एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा मात्र कस लागेल अशीच परिस्थिती आहे. 2017 ला एकत्रित शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर सेनेत फूट पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शहरप्रमुख नाना भानगिरे हेच एकमेव नगरसेवक आले होते, तर काँग्रेस पुरस्कृत म्हणून निवडून आलेले रवींद्र धंगेकर हेसुद्धा शिंदेसमवेत आले आहेत. मात्र, हडपसर वगळता शिवसेनेची अन्य शहरात ताकद अत्यल्प आहे, त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास मोठी कसरत लागणार आहे.

महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू

महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने स्वतंत्र महापालिका निवडणुका लढविल्यास काही प्रमाणात महाविकास आघाडीला त्याचा फायदा मिळू शकतो. महाविकास आघाडीत आता मनसेने एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघातील काही प्रभागांमध्ये महायुतीमधील मतविभाजनाचा फायदा एकत्रित महाविकास आघाडीला मिळू शकतो. मात्र, आघाडीकडे सद्यःस्थितीत तुल्यबळ उमेदवारांची वाणवा आहे. महायुती एकत्र लढली असती तर आघाडीला अनेक प्रभागात आयते मात्तबर उमेदवार मिळाले असते. आता मात्र ही शक्यता कमी आहे, त्याचा फटकाही आघाडीला बसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT