Pune Parvati Hill Pudhari
पुणे

Pune Parvati Hill Road: पावसाच्या तडाख्यात पुण्याची पर्वती टेकडी; पर्यटकांचा मार्ग झाला धोकादायक

माथ्यावर जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला; कचरा, पडलेली झाडे आणि अस्वच्छतेमुळे पर्यटक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात आल्यावर पर्यटकांचे आकर्षण केंद्र असणाऱ्या 'पर्वती'ची अवस्था पावसामुळे गंभीर झाली आहे. वयोवृद्ध पर्यटकांसाठी मागच्या बाजूने माथ्यापर्यंत जाण्यासाठी केलेला डांबरी रस्ता पूर्ण वाहून गेला आहे. मोठमोठ्या दगडांनी ही वाट बिकट झाली आहे.

पर्वतीवर पहाटेपासून फिरायला जाणाऱ्या पुणेकरांसह दररोज देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा मोठा ओघ असतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे टेकडीमागच्या बाजूने विष्णू मंदिरापर्यंत जाणारा रस्ताच वाहून गेला आहे. याकडे महापालिकेचे लक्ष नाही. तसेच, ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत, तर आजूबाजूला कचऱ्यांचे ढीग साचले आहेत.

इथे रस्ता होता...?

पर्वती टेकडीवर समोरच्या बाजूने तरुणाई जाऊ शकते. मात्र, ज्यांना पायऱ्या चढताना त्रास होतो, त्यांना आता वर जाणे अवघड झाले आहे. मागच्या बाजूने लक्ष्मीनगरातून रमणा गणपतीजवळून डावीकडे वळण घेतले की, म्हाडा कॉलनी दिसते. तेथून थेट वाहन घेऊन माथ्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता होता. आता त्या रस्त्याचे काही अवशेष दिसतात. इथे रस्ता होता हे शिल्लक असलेल्या डांबरी पॅच पाहून समजते.

कुत्री, डुकरांचे साम्राज्य

टेकडीच्या मागच्या बाजूला प्रचंड मोठा कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी कुत्री आणि डुकरांचा सतत वावर असतो. त्यामुळे पर्यटकांना धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT