Pune Rave Party Raid Pudhari
पुणे

Pune Rave Party Raid: तुळापूरमधील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर गुन्हे शाखेचा छापा; १५६ जणांची चौकशी, अमली पदार्थ जप्त

मद्य, गांजा आणि प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्ससह मोठा साठा जप्त; परवाना उल्लंघनाचा पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

कोरेगाव भीमा: आळंदी- मरकळ मार्गावरील तुळापूर परिसरात नदीकिनारी असलेल्या विश्वसंस्कृती (फॉर्म हाऊस) या खासगी बंगल्यात शनिवारी (दि. ६) सुरू असलेल्या कथित ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ७) पहाटे धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींची चौकशी करण्यात आली असून मद्य, गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स तसेच मोठ्या प्रमाणातील मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात अनधिकृतरीत्या पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ७ जून रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या मोहिमेसाठी १५ अधिकारी आणि ६५ पोलिस अंमलदारांचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) तेजस्विनी सातपुते, डिसीपी गोहर हसन, एसीपी शंकर खटके यांनीही यांनी भेट देत पाहणी करून तपासकामी सूचना दिल्या.

छाप्यादरम्यान कार्यक्रमस्थळी एकूण १०७ पुरुष आणि ४९ महिला, असे १५६ जण उपस्थित असल्याचे आढळून आले. त्यापैकी तीन व्यक्तींचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती मिळत आहे. पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये आयटी क्षेत्रातील काही तरुण-तरुणींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान मद्यविक्री व मद्यसेवन परवान्याची मुदत ६ जून रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंतच वैध असल्याची माहिती पुढे येत असून परवाना अटींचे उल्लंघन झाले आहे का ? याचाही तपास पोलिसांकडून होत आहे.

कारवाईत अल्प प्रमाणात गांजा, तीन हुक्का पॉटसह १० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्सही जप्त करण्यात आले. तसेच कार्यक्रमस्थळी सुमारे ९ लाख २२ हजार रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत अंदाजे ८५ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजकांची ओळख पटली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून जप्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गुन्हे नोंदविण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT