सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर : जिल्ह्यात अनेक गावांना अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर देखील जिल्ह्यातील 100 टक्के गावांची सुधारित पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सर्व गावे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सवलतींपासून वंचित राहणार आहेत. महसूल विभागाच्या वतीने खरीप व रब्बी हंगाम पिकांची सुधारित पैसेवारी जाहीर झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सन 2025/26 ची हंगामी सुधारित पैसेवारी ऑक्टोबरअखेरपर्यंत जाहीर केली जाते. जिल्ह्यातील 15 तहसीलदारांनी यासंदर्भात अहवाल सादर केला. जिल्ह्यात 1 हजार 925 गावांपैकी 1 हजार 379 गावे खरीप व 543 गावे रब्बी आहेत. यातील 1 हजार 295 गावांची खरीप सुधारित पैसेवारी ही 550 पैशांपेक्षा जास्त आली आहे, तर 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव जिल्ह्यात सापडले नाही.
जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड हे संपूर्ण तालुके रब्बीचे तालुके आहेत. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा हे प्रामुख्याने खरिपाचे तालुके म्हणून ओळखले जातात. परंतु यंदा खरीप हंगामाची सुरुवातच प्रचंड वादळी वारे व पाऊस झाला. मे महिन्यातच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्यांना खरीप पिकांच्या पेरण्या करता आल्या नाहीत. अतिवृष्टीमुळे बहुतेक सर्व तालुक्यात सोयाबीनसह खरीप पिकांना प्रचंड मोठा फटका बसला. याशिवाय दिवाळीनंतर अवकाळी पावसाने ऐन काढणीला आलेल्या भात व अन्य खरीप पिकांना झोडपून काढले. यामुळेच यंदा प्रचंड पाऊस होऊन देखील शेतकरी अडचणीत सापडला आहे. असे असताना महसूल विभागाच्या पैसेवारीमध्ये पुणे जिल्ह्यातील 100 टक्के गावांची 50 पैशांपेक्षा अधिक पैसेवारी आली आहे. याचा फटका आता शेतकर्यांना बसणार असून, शासकीय योजना व इतर गोष्टीचा लाभ मिळणार नाही.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा फटका खेड, जुन्नर आंबेगाव, भोर, वेल्हा, मावळ आणि मुळशी तालुक्यातील शेतकर्यांना बसला आहे. या तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी देखील या सर्व तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक आहे.
तालुका -संख्या
हवेली 89
पिंपरी-चिंचवड 01
पुणे शहर 01
मावळ 165
मुळशी 139
शिरूर 55
बारामती 00
इंदापूर 00
तालुका संख्या
दौंड 00
भोर 159
वेल्हा 120
पुरंदर 62
खेड 191
जुन्नर 178
आंबेगाव 135
एकूण 1295