Illegal Overhead Cables Pudhari
पुणे

Pune Overhead Cables Removal: पुण्यात ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी कडक SOP; धोकादायक केबल्सवर मोठी कारवाई

शहरातील रस्त्यांवरील लटकणाऱ्या केबल्स हटवण्यासाठी स्थायी समितीकडून नवी नियमावली तयार; पालखी मार्गासह महत्त्वाच्या भागांवर विशेष मोहीम राबवणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील रस्त्यांवर, पदपथांवर आणि घरांच्या दारांसमोर लटकणाऱ्या ओव्हरहेड केबल्सच्या जीवघेण्या समस्येवर स्थायी समितीने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड महिन्यापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, गेल्या दोन दिवसांत या केबल्स पूर्णपणे अंडरग्राउंड (भूगती) करण्यासाठी एक अत्यंत कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नवी एसओपी येत्या गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली.

शहरातील विविध भागांमध्ये ओव्हरहेड केबल्समुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याने महापालिकेने यापूर्वी कारवाई सुरू केली होती. मात्र, केबल ऑपरेटरांचा विरोध आणि स्पष्ट धोरणाचा अभाव, यामुळे कारवाईला अपेक्षित गती मिळू शकली नव्हती.

आता नव्या नियमावलीमुळे केबल टाकणे, त्यांची देखभाल करणे, परवानग्या देणे तसेच अनधिकृत केबल्स हटविण्याबाबत स्पष्ट नियम निश्चित करण्यात येणार आहेत. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर एसओपीची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक आणि अनधिकृत केबल्स हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील होर्डिंग्जबाबतही महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. होर्डिंग्जचे दर निश्चित होईपर्यंत नवीन होर्डिंग्जना परवानगी देऊ नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई सुरू असून, डिजिटल होर्डिंग्जमुळे संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन त्यांना परवानगी देताना प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देशही देण्यात आल्याचे भिमाले यांनी सांगितले.

पालखी मार्गावरील धोकादायक केबल्सवर तत्काळ कारवाई!

सध्या आषाढी पालखी सोहळा जवळ येत असल्याने पालखी मार्ग असलेल्या पालखी चौक आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या आणि पडलेल्या केबल्स काढण्याचे आदेश संबंधित खासगी कंपन्यांना देण्यात आले आहेत. आदेश न मानणाऱ्या कंपन्यांच्या केबल्स जप्त केल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT