No Parking Pudhari
पुणे

Pune No Parking: पुण्यात अनेक रस्त्यांवर ‘नो पार्किंग’; वाहतूक पोलिसांचे नवे आदेश

डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, येरवडा, चंदननगर, विश्रामबाग परिसरातील मार्गांचा समावेश; १३ सप्टेंबरपर्यंत सूचना मागवल्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर, येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आले असून, त्याबाबतचे आदेश पोलिस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशान्वये डेक्कन वाहतूक विभागाअंतर्गत आपटे रोड येथील धनराज सोसायटी गेट समोर दोन्ही बाजूंस मिळून ५० मीटर, कमला नेहरू पार्कच्या मुख्य गेटच्या समोर दीडशे मीटर, आपटे रोड येथील भाऊसाहेब शेळके पथ मनीषा अपार्टमेंटसमोर दोन्ही बाजूंस २० मीटर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.

असे आहेत वाहतूक विभागांतर्गत ‘नो पार्किंग झोन’

  • सिंहगड रोड : जय श्री आई माता किचन वेअर ते दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे दोन्ही बाजूंस १५ मीटर, नऱ्हे येथील महाराष्ट्र बँक चौकातील मल्हारगड सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर २० मीटर नो पार्किंग झोन आहे.

  • कोथरूड : साम्राज्य बळवंतपुरम सोसायटी गेट नंबर १ व गेट नंबर २ च्या दोन्ही बाजूंस भिंतीलगत १० मीटरदरम्यान तसेच मातोश्री आश्रमकडून गिरिजा चौकातून डावीकडील दोन्ही बाजूंस २५ मीटर, डीपी रोडवरील पंडित फार्म गेट क्रमांक १ ते ३ दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूंस नो पार्किंग करण्यात येत आहे.

  • येरवडा : विश्रांतवाडी ते एअरपोर्ट या मार्गावर सिद्धेश्वर चौक ते केकाण पेट्रोल पंपापर्यंत रोडच्या डाव्या बाजूस दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी समांतर पार्किंग करण्यात येत आहे. तसेच ५०९ चौकाकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर चौकापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.

  • चंदननगर : चंदननगर वाहतूक विभागाअंतर्गत गंगा अल्टस सोसायटी समोरील रस्त्यावर डाव्या बाजूस १०० मीटर व उजव्या बाजूस ५० मीटर नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत मौजे गोपाळ गायन समाज बिल्डिंग व लिमये होम या दोन्ही इमारती समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंस १५ मीटर, राधा स्वामी सत्संग ते नाबार्ड सोसायटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंस पी-१ पी-२ पार्किंग करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांनी काही सूचना असल्यास १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन डॉ. भाजीभाकरे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT