

पुणे: केंद्रीय अन्न मंत्रालयातने सप्टेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यासाठी (१ ते १५ सप्टेंबर) १३ लाख मेट्रिक टनाइतका साखरेचा कोटा खुला केला आहे. पंधरा दिवसांच्या नवीन वाटप प्रणालीअंतर्गत जाहीर झालेल्या या पहिल्याच मुबलक कोट्यामुळे सोमवारी (दि.३१) साखरेचे दर घाऊक बाजारात क्विंटलला पाचशे रुपेयांनी पुन्हा उतरून ५००० रुपये झाले आहेत. बाजारात ग्राहकांकडून खरेदीही कमीच होत आहे, तर कारखान्यांवरील निविदाही कमी होऊन ४५०० ते ४७०० रुपये दरापर्यंत खाली आल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली.
केंद्राने ऑगस्ट महिन्यासाठी एकूण २२.५0 लाख टन साखर कोटा खुला केला होता. म्हणजेच पंधरवड्याला साधारण ११.२५ लाख टनांच्या तुलनेत सप्टेंबरचा पहिल्या पंधरवड्यासाठी कोटा मुबलक असून, सणासुदीच्या काळापूर्वीच वाढणाऱ्या महागाईला रोखण्यासाठी तो देण्यात आला. त्यानुसार दरपातळी खाली येण्यास मदत झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील साखर पुरवठ्यामध्ये भारतीय साखर कारखान्यांकडील १२ लाख मेट्रिक टन आणि कांडला रिफायनरीतील एक लाख मेट्रिक टन मिळून एकूण निव्वळ पुरवठा तेरा लाख मेट्रिक टनाचा केंद्राने निश्चित केला आहे.
श्रावण महिना, आगामी गौरी-गणेशोत्सवाची मागणी पाहता कोटा मुबलक असून सात दिवसांत ४० टक्के साखर विक्रीच्या बंधनामुळे बाजारात मुबलक पुरवठा अपेक्षित आहे. यामुळे यापूर्वी होणाऱ्या साखर विक्रीतील अनिष्ट प्रथांना आपोआपच लगाम बसणार आहे. कारण, सात दिवसांत माल पाठवण्याचे (डिस्पॅच) अनिवार्य नियम आणि पंधरवड्याच्या कोट्याची मर्यादा आहे.
त्यामुळे कारखाने हे न विकलेला साखर साठा पुढे ढकलू शकणार नाहीत. शिवाय कागदोपत्री होणारी साखर विक्री आणि सट्टेबाजांचा शिरकावसही मर्यादा येणार आहे. परिणामी, बाजारपेठेत मुबलक साखरेचा पुरवठा होऊन ग्राहकांना वाजवी दरात ती उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती जाणकार व्यापाऱ्यांकडून देण्यात आली.
साखरेच्या बदलत्या नवीन नियमानुसार व्यापाऱ्यांचा कलही आता गरजेनुसारच साखर खरेदीकडे वाढणार असून, दरात फार मोठी तेजी-मंदीची शक्यता तुर्तास मावळल्याची स्थिती आहे. शिवाय देशात १५ ऑक्टोबरपासून नवीन हंगाम सुरू होत असल्यामुळे उत्पादित नवीन साखरही बाजारात येणार आहे. त्यामुळेही साखरेचा मुबलक पुरवठा होण्यास मदत होऊन दर स्थिरावतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली.