Pune Development Plan Pudhari
पुणे

Pune Development Plan: पुण्यातील नऊ गावांच्या विकास आराखड्यात १४३ बदल; उंड्रीतील महामार्गाची रुंदी ६० वरून ४५ मीटर

नागरिकांच्या हरकती-सूचनांनंतर रस्ते, आरक्षणे आणि सार्वजनिक सुविधांच्या नियोजनात फेरबदल; सुधारित आराखडा अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महापालिकेत समाविष्ट नऊ गावांच्या विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देताना रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या नियोजनात मोठे बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी दाखल केलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून १४३ क्रमांकात फेरबदल केले असून, यामध्ये अनेक रस्त्यांची प्रस्तावित रुंदी कमी करण्यापासून सार्वजनिक सुविधांची आरक्षणे रद्द करणे, त्यांचे स्थलांतर आणि प्रयोजन बदलण्यापर्यंतचे निर्णय घेण्यात आले आहेत. उंड्रीतील राज्य महामार्गाची रुंदी ६० मीटरऐवजी ४५ मीटर करण्याचा निर्णय विशेष लक्षवेधी ठरला आहे. सुधारित विकास आराखडा शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.

नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आराखड्याला गती

२०१७ मध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांपैकी नऊ गावांच्या विकास आराखड्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात आली आहे. लोहगाव, मुंढवा-केशवनगर, हडपसर (साडेसतरानळी), उंड्री, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी आणि शिवणे या आठ सेक्टरमधील फेरबदलांची यादी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाच्या कलम २८ (४) अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.

रस्त्यांच्या रुंदीवर मोठी कात्री

रस्त्यांच्या नियोजनात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. उंड्रीतील राज्य महामार्ग क्रमांक ११६ ची रुंदी ६० मीटरवरून ४५ मीटरवर केली आहे. लोहगावमधील धानोरी-वाघोली रस्त्याची रुंदी ३६ मीटरऐवजी २४ मीटर प्रस्तावित केली आहे. मुंढवा-केशवनगरमधील काही ३६ मीटर रुंदीचे रस्ते १८ ते २४ मीटरपर्यंत कमी करण्यात आले. याशिवाय २४ मीटरचे रस्ते १८ मीटर, तर १८ मीटरचे रस्ते १२ मीटर करण्याचे बदलही करण्यात आले आहेत. काही रस्त्यांचे मार्ग बदलून पर्यायी संरेखन निश्चित केले आहे. दुसरीकडे, हडपसरमधील काही ठिकाणी १५ मीटरचा रस्ता १८ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे बदल आणि परिणाम

  • आरक्षणे उठवली : अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाल्याने मूळ आरक्षणे कायम ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही आरक्षणे रद्द करून संबंधित भूभाग निवासी वापरासाठी प्रस्तावित करण्यात आला.

  • रस्त्यांचे स्थलांतर : बांधकामे आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीमुळे काही रस्त्यांचे मार्ग बदलले आहेत. त्यामुळे मूळ नियोजनात बदल करावा लागला.

  • हरकतींची दखल : प्राप्त हरकतींपैकी ७० ते ७५ टक्के सूचनांचा सकारात्मक विचार करून एकूण १४३ फेरबदल केले आहेत.

  • रस्त्यांशी संबंधित सर्वाधिक बदल : एकूण फेरबदलांपैकी ८४ बदल रस्त्यांच्या जाळ्याशी संबंधित आहेत. आरक्षणांमध्ये २८, तर सुविधा क्षेत्रांमध्ये ३० बदल केले आहेत.

धायरीमध्ये टर्मिनल उभारणार

धायरीमध्ये बस डेपोच्या आरक्षणाचे विभाजन करून एका भागात ट्रक टर्मिनल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक सुविधा केंद्रासाठी राखीव असलेल्या जागेवर पोलिस ठाणे प्रस्तावित केले असून, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठीही पर्यायी जागा निश्चित केली आहे. आंबेगाव बुद्रुकमधील वीज वितरण कंपनीचे आरक्षण आंबेगाव खुर्द येथे हलविण्यात आले आहे. रस्त्यांच्या रुंदीतील बदल आणि सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणांचे रद्दीकरण, स्थलांतर व प्रयोजनातील फेरबदल यामुळे नऊ गावांच्या विकासाचे नियोजन नव्याने आकाराला येणार आहे. आता राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर या बदलांवर शिक्कामोर्तब होणार असल्याने या प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोहगावमध्ये सर्वाधिक बदल

नऊ गावांचा विकास आराखडा तयार करताना प्रारूप आराखड्यामध्ये सर्वाधिक ३१ (२२ टक्के) बदल लोहगावमध्ये केले आहेत. त्यानंतर मुंढवा-केशवनगर १५ (१० टक्के), हडपसर (साडेसतरानळी) १५ (१० टक्के), उंड्री १९ (१३ टक्के), आंबेगाव बुद्रुक १७ (१२ टक्के), आंबेगाव खुर्द ७ (५ टक्के), धायरी २० (१४ टक्के), शिवणे आणि उत्तमनगर येथील १८ (१३ टक्के) ठिकाणी फेरबदल केले आहेत. नकाशे आणि फेरबदलांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच नगररचना कार्यालय आणि महापालिका मुख्यालयात ३० दिवसांसाठी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर कलम ३० नुसार अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून नगरविकास विभागाकडून या आराखड्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

मैदानांपासून दवाखान्यांपर्यंत आरक्षणांत बदल

सार्वजनिक सुविधांच्या आरक्षणांमध्येही महत्त्वपूर्ण फेरबदल झाले आहेत. लोहगावमध्ये खेळाचे मैदान, महापालिका कार्यालय, पाण्याची टाकी आणि अर्बन स्पेससाठीची काही आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत. आंबेगाव बुद्रुकमध्ये मैदाने, सांस्कृतिक सभागृह आणि उद्यानांच्या आरक्षणांत बदल करण्यात आले आहेत. शिवणे येथे दवाखाना, उद्यान आणि शॉपिंग सेंटरच्या आरक्षणांचे प्रयोजन बदलले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT