पुणे

Pune : शहरात नऊ हजार जोडप्यांना पाच अपत्ये!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नऊ हजार जोडप्यांना पाच किंवा त्याहून अधिक अपत्ये असल्याची बाब महापालिकेतर्फे झालेल्या कुटुंब सर्वेक्षणातून समोर आली आहे. आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षणात जननक्षम जोडप्यांची माहिती संकलित करण्यात आली. शहरात 4 लाख 46 हजार पात्र जननक्षम जोडपी आढळून आली असून, त्यापैकी 2 टक्के जोडप्यांना पाच किंवा त्याहून अधिक अपत्ये असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात 27 टक्के जोडप्यांना एक अपत्य, 21 टक्के जोडप्यांना 2 किंवा 3 अपत्ये, 7 टक्के जोडप्यांना 4 अपत्ये आणि 2 टक्के जोडप्यांना पाच किंवा पाचहून अधिक अपत्ये असल्याचे आढळून आले आहे. तर, 6 टक्के जोडप्यांना मूल नसल्याचे नोंदवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या 350 परिचारिकांनी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरामध्ये जाऊन माहिती संकलित केली आहे. शहरात या वर्षीच्या सर्वेक्षणाला 8 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये जननक्षम जोडपी, गर्भवती माता, 0-5 वर्ष वयोगटातील बालके, असांसर्गिक रुग्ण यांची माहिती संकलित केली जाणार आहे. सर्वेक्षणादरम्यान महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याविषयी निर्देशाकांची इत्थंभूत माहिती संकलित करून नागरिकांच्या आरोग्याविषयी गरजांच्या प्राधान्यांनुसार आरोग्य योजनांचे व सेवांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. कुटुंब पाहणी सर्वेक्षणाची आकडेवारी 31 मेपर्यंत संकलित करून 15 जून रोजी अहवाल सादर केला जाईल.

कोणती माहिती संकलित केली

जननक्षम जोडपी, कुटुंबनियोजनाच्या वापरल्या जाणार्‍या पद्धती व गरज, संरक्षित व असंरक्षित जननक्षम जोडपी यांची माहिती.
गरोदर मातांच्या वेळोवेळी केल्या जाणार्‍या आरोग्य तपासण्यांची माहिती विशेषतः रक्तक्षयाचे प्रमाण धनुर्वात लसीकरण स्थिती, अतिजोखमीच्या गरोदर मातांची माहिती. 0-5 वर्ष वयोगटातील कमी वजनाची व कुपोषित बालकांची माहिती, लसीकरणाविषयी बालकांची माहिती, गंभीर आजारग्रस्त बालके. उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, मधुमेह, श्वसनाचे आजार व कर्करोग रुग्णांची माहिती.

कुटुंब पाहणी सर्वेक्षणामुळे माता व बालक यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिकामधील सोसायट्या, चाळी, वसाहतीमधील नागरिकांनी सर्वेक्षणास येणार्‍या परिचारिकांना सहकार्य करावे.

 – डॉ. भगवान पवार,मुख्य आरोग्य अधिकारी, महापालिका

हेही वाचा

SCROLL FOR NEXT