राजधानीत उडणार प्रचाराचा धुरळा | पुढारी

राजधानीत उडणार प्रचाराचा धुरळा

प्रशांत वाघाये

आगामी लोकसभा निवडणुकीत विविध राज्यांसह राजधानी दिल्लीकडेही सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या दरम्यान दिल्लीतील सात पैकी सातही जागा भाजपने जिंकल्या. तर विरोधात असलेल्या आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला गेल्या दहा वर्षांत लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही. मागील दोन लोकसभा निवडणुकांत भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आम आदमी पक्ष असा तिरंगी सामना रंगला होता. यावेळी मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीद्वारे एकत्रितपणे भाजपशी दोन हात करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे नेतृत्व, राम मंदिर, हिंदुत्व, दिल्लीत असलेल्या बहुभाषिक नागरिकांसाठी केलेली कामे, प्रशासकीय स्तरावर केलेल्या सुधारणा, देशाची राजधानी आणि मेट्रो सिटी म्हणून दिल्लीसाठी केलेली विशेष कामे, नागरीकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी, कलम 370 यासारख्या मुद्द्यांसह दिल्लीत भाजप निवडणुकीला सामोरा जाणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासह सहकार्‍यांवर झालेले गैरव्यवहाराचे आरोप, त्यांचे अटकेत असलेले नेते, या मुद्द्याचेही भांडवल भाजप करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे दिल्लीतील लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ‘आप’कडे अरविंद केजरीवाल हीच सगळ्यात मोठी प्रतिमा असणार आहे. दिल्लीत अरविंद केजरीवालांनी सरकारच्या माध्यमातून केलेली कामे, दिल्ली महापालिकेच्या माध्यमातून केलेली कामे, दिल्लीतील नागरिकांना दिलेल्या सोयीसुविधा या मुद्द्यावर भर देण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत विजय मिळवून देणारे शिक्षण, आरोग्य सेवा मॉडेल, मोफत पाणी आणि वीज योजना या मुद्द्यांवरही प्रचार होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल, त्यापूर्वी त्यांचे प्रमुख सहकारी मनीष सिसोदिया, संजय सिंह यांना झालेली अटक हा देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. या सर्व नेत्यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे आणि केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहे, अशा स्वरूपाचा प्रचार यापूर्वीच ‘आप’ने सुरू केला आहे. तर ‘आप’सोबत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिल्लीत सत्तेत असताना काँग्रेस पक्षाने दिल्लीत केलेली कामे, मेट्रो, उड्डाणपूल आणि विविध सेवांचा केलेला विस्तार तसेच ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, त्या राज्यांमध्ये काँग्रेसने केलेली कामे या गोष्टी काँग्रेसकडून प्रचारामध्ये सांगितल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून विविध तपास यंत्रणांचा गैरवापर होतो, अशा प्रकारचे आरोप आधीपासूनच काँग्रेस पक्ष करत आहे, त्याचा पुनरुच्चार निवडणूक प्रचारात काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

Back to top button