Street Food Pudhari
पुणे

Pune Night Food Vendors Issue: पुण्यात नाईट फूड व्हेंडिंग झोनची मागणी; हातगाडी व्यावसायिकांवर कारवाईचा निषेध

रात्री 10 नंतर स्टॉल्स बंद करण्याच्या निर्णयामुळे छोट्या व्यावसायिकांचे नुकसान; नागरिकांसाठी स्वस्त अन्नाचा पर्याय बंद झाल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात कोणतीही घटना घडली की सर्वप्रथम हातगाडी, फेरीवाले आणि स्टॉलधारकांवर कारवाई केली जाते. मात्र, रात्री उशिरापर्यंत काम करणारे नागरिक, विद्यार्थी, प्रवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात अन्न पुरवण्याचे महत्त्वाचे काम हेच हातगाडी व्यावसायिक करीत असल्याचे सांगत जाणीव संघटनेने पुण्यात तातडीने ‌‘नाईट फूड व्हेंडिंग झोन‌’ सुरू करण्याची मागणी केली आहे.

शहरात रात्री 10 वाजता हातगाडी व्यवसाय बंद केल्याच्या घटनेचा पथारी व्यावसायिकांच्या जाणीव संघटनेने निषेध केला आहे. रेल्वे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडी बसस्थानक, तसेच हिंजवडी आयटी पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. मात्र, बहुतांश हॉटेल्स बंद झाल्यानंतर सर्वसामान्यांना स्वस्त दरात अन्न मिळण्याचा एकमेव पर्याय म्हणजे हातगाडी व स्टॉलधारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

स्ट्रीट व्हेंडर्स कायदा 2014 नुसार फेरीवाल्यांना उपजीविकेचा अधिकार असून, विक्रीच्या वेळांवर कोणतेही स्पष्ट निर्बंध नाहीत. तसेच राष्ट्रीय पथ विक्रेता धोरण 2009 मध्ये 24 तास फूड स्ट्रीट संकल्पनेलाही प्रोत्साहन देण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. अहमदाबादमधील माणेक चौक, इंदूरमधील सराफा बाजार आणि मुंबईतील काही भागांत रात्री खाद्यविक्रीला अधिकृत परवानगी असल्याचे उदाहरणही देण्यात आले.

पुण्यात किमान पाच हजार नाईट फूड स्टॉल सुरू झाल्यास सुमारे 20 हजार रोजगार निर्माण होतील, तसेच महापालिकेलाही महसूल मिळेल, असे संघटनेचे कार्यवाह संजय शंके यांनी म्हटले आहे. स्टेशन, बसस्थानक, आयटी पार्क व रुग्णालय परिसरात ‌‘नाईट फूड व्हेंडिंग झोन‌’ जाहीर करून रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत नोंदणीकृत विक्रेत्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रात्री दहाच्या बंदीचा फटका छोट्या व्यावसायिकांना

पर्वती व सहकार नगर भागातील छोट्या खाद्यपदार्थांच्या व्यावसायिकांना रात्री दहा वाजताच व्यवसाय बंद करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाचा मोठा फटका बसत आहे. सारंग सोसायटीत फूड स्टॉल चालविणारे व्यावसायिक विश्वास शेंडे म्हणाले, हा नियम अत्यंत चुकीचा आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी छोट्या व्यावसायिकांची गळचेपी करणे योग्य नाही. गॅस तुटवड्यामुळे आधीच आमच्या व्यवसायाला फटका बसला आहे. त्यात आता पोलिसांची ही कारवाई सुरु झाल्याने आम्ही जगायचे कसे. मोठ्या हॉटेलांना रात्री दीड पर्यंत परवानगी आणि छोट्या व्यावसायिकांनी मात्र दहा वाजताच तो बंद करायचा हा भेदभाव योग्य नाही.

दहानंतर बंद झाले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स

पुणे-सातारा रस्ता, मार्केट यार्ड, लुल्लानगर, वानवडी आदी भागांमध्ये रात्री दहानंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद झाल्याचे बुधवारी दै. ‌’पुढारी‌’च्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले. तर, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट रात्री साडेदहानंतरही सुरू होते. तर दुसरीकडे या भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्तही दिसून आला. रात्री दहानंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स बंद होत आहेत, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीजवळील स्टॉल्स, मार्केट यार्ड येथील स्टॉल्स, लुल्लानगर अणि वानवडी भागातील काही स्टॉल्स चालकांकडून बंद करण्यात आल्याचे पाहणीत दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT