

पुणे: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांनी रात्री 10 नंतर खाऊ गल्ल्या बंद करण्याचे आदेश दिल्याने शहरात त्याचे उलट सुलट पडसाद उमटू लागले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीने रात्रीच्या वेळी शहरातील फुटपाथवर होणारी गर्दी कमी झाली असून रहिवाशांनी सुटकेचा नि:स्वास सोडला आहे. तर रास्त दरात खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या खाऊ गल्ल्या बंद झाल्याने विद्यार्थी व परगावहून येणाऱ्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे.
खाऊ गल्ल्या, खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे बंद झाली असली, तरी अनेक तरुण- तरुणी आणि नागरिक नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत येथे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत होते. मात्र, हे अड्डे बंद असल्याने नाइलाजाने त्यांना उपाशी पोटी परतावे लागले. या संदर्भात काही विक्रेत्यांशी संवाद साधला असता, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रात्री 10 वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आम्हाला व्यवसाय बंद करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने बुधवारी रात्री शहरातील नळ स्टॉप, डेक्कन आणि विविध परिसरात फिरून प्रत्यक्ष पाहणी केली असता, पोलिसांकडून रात्री 10 वाजताच डेक्कन झेड बिजखालील आणि बिजवरील तसेच नळ स्टॉप परिसरातील खाऊ गल्ल्या बंद केल्याचे दिसून आले. मात्र, त्याच वेळी डीपी रोड, म्हात्रे पूल परिसर, मध्यवस्तीतील मोठे हॉटेल्स सुरूच असल्याचे दिसले.
बंदी फक्त गरिबांच्या खाऊ गल्ल्यांनाच आहे का?
एकीकडे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हक्काचे ठिकाण असलेल्या खाऊ गल्ल्या 10 वाजता बंद झाल्या असताना, दुसरीकडे शहरातील मोठमोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मात्र रात्री 10 नंतरही थाटात सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे रात्री 10 नंतरची बंदी फक्त खाऊ गल्ल्यांनाच की बड्या हॉटेल्सनासुद्धा आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आम्ही अभ्यासिकेतून रात्री 10 ते 10.30 ला बाहेर पडतो. दिवसभर अभ्यास करून रात्री कमी बजेटमध्ये पोटभर जेवण्यासाठी हे खाऊ गल्लीचे स्टॉल्स आमचा एकमेव आधार आहेत. आता 10 वाजताच हे स्टॉल्स बंद झाले, तर आम्ही रात्री खायचं काय? बड्या हॉटेल्समध्ये जाऊन रोज जेवणं आमच्या खिशाला परवडणारे नाही. प्रशासनाने गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरक्षा जरूर वाढवावी, पण रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटावर मारू नये. हॉटेल्स सुरू आणि खाऊ गल्ल्या बंद, हा कुठला न्याय?
आदित्य वाघमारे, एमपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी.