पुणे

Pune News : हवेलीत हजारोंच्या कुणबी नोंदी!

Laxman Dhenge

खडकवासला : सिंहगड भागासह हवेली तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा तसेच हवेली तहसील कार्यालयासह विविध विभागांत हजारोंच्या संख्येने कुणबी नोंदी असल्याचे पुढे आले आहे. त्यासाठी हवेली तालुका प्रशासनाने मोडी वाचकांसह विविध विभागांची मदत घेतली आहे. सिंहगडाच्या पायथ्याला डोणजे (ता. हवेली) येथे पहिली मराठी शाळा 1865 मध्ये सुरू झाल्याचे कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेत पुढे आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम शासनाने युध्दपातळीवर सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या चोहोबाजूंना पसरलेल्या हवेली तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कागदपत्रांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तहसील कार्यालयात कुणबी दस्तऐवजांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

पुण्याजवळील हिंगणे खुर्दपासून वडगाव, खडकवासला, धायरी ते पानशेतपर्यंत 1875 मध्ये पहिली मराठी शाळा डोणजे येथे सुरू झाली. पूर्वीच्या काळात मावळ विभागाचा प्रशासकीय कारभार त्या वेळी डोणजे पेठ येथे सुरू होता. डोणजे शाळेतील विद्यार्थी दाखल रजिस्टरमध्ये मराठ्यांच्या जातीचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. त्या आधारे डोणजे परिसरातील शंभराहून अधिक जणांनी कुणबी दाखले काढले आहेत.

ऐतिहासिक दस्तावेजांत नोंदी शोधणार

  • डोणजे शाळेप्रमाणे शहर परिसरातील जुन्या शाळांतील कागदपत्रांची होणार तपासणी
  • हवेली तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये कुणबी नोंदीच्या कागदपत्रांचा खजिना
  • पहिल्या टप्प्यात मराठा कुणबी नोंदीची कागदपत्रे संकलित करण्यात येणार
  • ऐतिहासिक दस्तावेजांसह ब्रिटीशकालीन जनगणना, गॅझेट, महसुली दप्तरामध्ये कुणबी नोंदीचा शोध घेणार

शहराच्या सभोवताली हवेली तालुक्याचा विस्तार आहे. बि—टिश राजवटीपासून तहसील रेकॉर्डमध्ये असलेल्या गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये मराठ्यांच्या जातीचा उल्लेख कुणबी म्हणून नमूद केला आहे. हा मजकूर मोडी लिपीत असल्याने त्याचे वाचन करण्यासाठी पाच मोडी लिपी वाचक नियुक्त केले आहेत. तसेच गावोगावच्या जुन्या शाळांतील कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घेतली जात आहे.

– किरण सुरवसे, तहसीलदार, हवेली तालुका.

सध्या डोणजे शाळा जिल्हा परिषदेकडे आहे. फलकावर शाळेची स्थापना 1875 मध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र, 1865 पासूनचे सर्व दप्तर शाळेत सुस्थितीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काही वर्षे मराठा विद्यार्थ्यांचा उल्लेख कुणबी जात आहे.

बाजीराव पारगे, जिल्हाध्यक्ष, दिव्यांग विकास आघाडी

हेही वाचा

SCROLL FOR NEXT