सातारा : फटाके फोडण्याच्या कारणावरून पाठलाग करून युवकावर वार | पुढारी

सातारा : फटाके फोडण्याच्या कारणावरून पाठलाग करून युवकावर वार

कराड; पुढारी वृत्तसेवा : रविवारी फटाके फोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाच्या रागातून कराडमधील शिंदे गल्लीतील एका युवकावर तिघा युवकांनी दत्त चौकात सायंकाळी सातच्या सुमारास सशस्त्र हल्ला केला. युवकावर कोयत्याने वार करत असताना दोन होमगार्डनी संशयितांवर मोठ्या धाडसाने झडप घातल्याने अनर्थ टळला. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, दोन संशयितांनी पलायन केले आहे. ओम गणेश बामणे (वय 18) असे जखमी युवकाचे नाव आहे.

ओम बामणे आणि संशयित युवकांमध्ये रविवारी दीपावलीच्या पहिल्या दिवशी फटाके फोडण्यावरून वादावादी झाली होती. यावेळी संशयितांनी ओम बामणे याला जिंवत ठेवणार नाही अशी धमकीही दिली होती. याप्रकरणी ओम बामणेसह संशयितांनी परस्पराविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर समज देत पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सोमवारी सायंकाळी कराड तहसील कार्यालयात बोलावले होते.

तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओम बामणे नातेवाईक महिलेसह घरी निघाला होता. यावेळी संशयित तहसील कार्यालय परिसरात कोयता घेऊन दबा धरून बसले होते. काही समजण्यापूर्वीच त्यांनी कोयता घेऊन ओमचा पाठलाग केला. ओम शाहू चौकापर्यत दुचाकीवरून आला. मात्र संशयित जवळ आल्याने त्याने दुचाकी भर रस्त्यात टाकून देत दत्त चौकाच्या दिशेने पळ काढला. याचवेळी संशयित हातात कोयता घेत ओमचा पाठलाग करत होते. सुदैवाने याचवेळी तेथून चालत जाणार्‍या दोघा होमगार्डनी झडप घालून एका हल्लेखोर युवकाला पकडले. मात्र अन्य दोन संशयितांनी तेथून पलायन केले. या कालावधीत कोयत्याचा एक वार हातावर तर दुसरा वार कपाळावर बसल्याने ओम बामणे गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे दत्त चौक परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती.

Back to top button