धाराशिव : उमरगा परिसरात उघड्यावर फेकला औषधांचा साठा | पुढारी

धाराशिव : उमरगा परिसरात उघड्यावर फेकला औषधांचा साठा

धाराशिव; उमरगा शंकर बिराजदार : राज्याचे आरोग्य मंत्री असलेल्या डॉ. तानाजी सावंत यांच्या धाराशिव परिसरात मोठा औषध साठा उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमरगा मुळज रस्त्यालगत असलेल्या उमरगा नगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा औषध साठा नेमका कुणाचा आहे?, कुठे ठेवण्यात आला? याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या

उमरगा मुळज रस्त्यालगत फेकून दिलेल्या वेगवेगळ्या गोळ्या- औषधाच्या हजारो, गोळ्याची पाकीटे, वेगवेगळी इंजेक्शन आदी वैद्यकिय साहित्य व बाटल्या उघड्यावर फेकल्या आहेत. यातील बहुतांशी औषधे व गोळ्या जनरिक आहेत. तर काही शुडल एच वन इंजेक्शनची पाकिटे, कानात टाकायच्या थेंबाच्या बाटल्या, वेदनाशामक व लहान बालकावर विविध आजारावरील उपचारासाठी वापरावयाची औषध- गोळ्या, इंजेक्शन, सिरप आहेत. काही औषधांच्या स्ट्रीप मुदतबाह्य आहेत. या गोळ्यांच्या नावावरून डॉक्टरांना विचारले असता ही औषधे बाल रुग्ण व मोठ्या रुग्णावर उपचारासाठी वापरात असल्याचे सांगितले.

अशा प्रकारची औषधे नष्ट करण्यासाठी काही नियम आहेत. या नियमानुसार औषध नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने मोठा साठा फेकून देण्यात आला आहे. मुदतबाह्य औषधे कोठेही उघड्यावर टाकून देता येत नाहीत किंवा ती जाळताही येत नाहीत. मुदतबाह्य टॅबलेट्स असतील तर त्या पाण्यात विरघळवून नष्ट कराव्या लागतात. सिरमबाबतही विशिष्ट कार्यपद्धती आहे. असे असले तरी राज्याचे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच याचे पालन होताना दिसत नसल्याची चर्चा परिसरातून होत आहे.

उघड्यावर औषधे फेकणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. सदरील औषधी साठ्याचा नगरपालिकेच्या वतीने इन कॅमेरा पंचनामा करणार असल्याचे मुख्याध्याकारी रामकृष्ण जाधवर यानी सांगितले आहे.

Back to top button