हडपसर : पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, रस्त्यांची दुरुस्ती करावी, स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, यासह विविध मागण्यांसाठी फुरसंगी ग्रामस्थांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 'श्रमिक बि—गेड'ने हडपसर क्षेत्रीय कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन केले.
संघटनेचे शहराध्यक्ष सुरज गायकवाड व उपाध्यक्ष महादेव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले होते. या वेळी महापालिकेच्या विरोधात फुरसुंगी ग्रामस्थांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. निर्जनस्थळी रस्त्याच्या कडेचे पथदिवे बसवावे, बंद असलेले दिवे चालू करावेत, परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी, फुरसुंगी परिसरातील पथारीवाल्यांना अधिकृत परवाने द्यावे, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष सतीश केदारी, माजी आमदार एल. टी. सावंत, विशाल हरपळे, उत्तम कामठे, आरपीआयचे शहर उपाध्यक्ष संतोष खरात, आशिष अल्हाट आदी या वेळी उपस्थित होते. सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून मागण्यासंदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकार्यांसोबत ग्रामस्थांचा आयोजित करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन या वेळी दिले.
हेही वाचा