सलग सहा तास विद्यार्थी करणार वाचन; बार्टीचा उपक्रम

सलग सहा तास विद्यार्थी करणार वाचन; बार्टीचा उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (बार्टी) सहा तास वाचन उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मुंबई येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके 85 टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील विश्वविख्यात उच्च विद्याभूषित ज्ञानाचे प्रतीक असून, त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेतील कोलंबिया विश्व विद्यापीठाने गौरवले आहे.

वाचाल तर वाचाल असा कृतिशील संदेश देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी राजगृह उभारले. त्यामध्ये 50 हजार दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून या देशात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चतुसूत्रीतून प्रत्येक भारतीय नागरिकास प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते असून, 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये, अनुयायांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, याकारिता 6 डिसेंबरला बार्टी पुणे मुख्यालयातील ग्रंथालय, येरवडा संकुल ग्रंथालय, बार्टीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथील ग्रंथालय, तसेच राष्ट्रीय स्मारक मुक्तीभूमी, येवला, बार्टी उपकेंद्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत 6 तास वाचन उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करणार आहेत.

अनुयायी विद्यार्थी, नागरिकांनी बार्टीच्या 6 तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषणे वाचन करून या संकल्प दिन उपक्रमात सहभागी व्हावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news