Pune News : ब्रॉस बॅण्डचा आव्वाज फक्त उपनगरात   | पुढारी

Pune News : ब्रॉस बॅण्डचा आव्वाज फक्त उपनगरात  

पुणेे : लग्नसराई म्हटले की, ब्रॉस बॅण्ड पथकांचे वादन आलेच…पण, यंदा आपल्याला बॅण्ड पथकांचा आवाज ऐकायचा असेल, तर उपनगरात जावे लागेल…कारण पुणे शहरातील मंगल कार्यालये, लॉन्समध्ये बॅण्ड पथकांच्या वादनाला परवानगी नसल्याचे चित्र असून, त्यामुळेच या वर्षी उपनगरांतील आणि ग्रामीण भागातील कार्यालयांमधील लग्नांमध्ये बॅण्ड पथकांचे वादन ऐकायला मिळत आहेत. विशेष म्हणजे जोडप्यांकडूनच उपनगर आणि ग्रामीण भागातील कार्यालये, लॉन्समध्ये लग्न करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणार्‍या लग्नांसाठी पथकांना वादनासाठी सर्वाधिक कामे मिळत असून, पथकांचा व्यवसाय आता उपनगर,  ग्रामीण भागाकडे वळला आहे. लग्नसराईच्या सीझनला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली असून, कार्यालये, लॉन्स, सभागृहे हाऊसफुल्ल बुक आहेत. लग्नांमध्ये महत्त्वाचा भाग असलेल्या ब—ॉस बॅण्ड पथकांच्या वादनाला चांगला प्रतिसाद आहे. पण, तो उपनगर आणि ग्रामीण भागात. त्यानुसार पथके वादनासाठी जात आहेत. अस्सल बॉलिवूड गीतांपासून ते लग्नांवर आधारित गीतांपर्यंतचे वादन कलाकार करत आहेत.  दरबार ब्रॉस बॅण्डचे इक्बाल दरबार म्हणाले,  वादनासाठी आम्ही उपनगर आणि ग्रामीण भागात जात आहोत. पथकांचा व्यवसाय आता उपनगर, ग्रामीण भागाकडे वळला आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळे आता कामे मिळायला सुरुवात झाली आहे.

शहरात का नाही  पथकांचे वादन?

  • वाहतूक कोंडी
  • स्थानिक नागरिकांना त्रास
  • वादनावर आलेली बंधने
  • कार्यालयांमध्ये पार्किंगची समस्या
  • पोलिसांकडून असलेली वेळेची मर्यादा

उपनगर आणि जिल्ह्यात कामे मिळण्याची कारणे

  • या भागात मोठी कार्यालये, लॉन्स असल्यामुळे वादनास परवानगी
  • आवाजाची तक्रार नसल्यामुळे वादनासाठी परवानगी
  • वादनासाठी कोणतीही  बंधने नाहीत

हेही वाचा

Back to top button