खडकवासला मेट्रो मार्गासाठी पाहणी : आमदारांची अधिकार्‍यांशी चर्चा | पुढारी

खडकवासला मेट्रो मार्गासाठी पाहणी : आमदारांची अधिकार्‍यांशी चर्चा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला व एनडीए रस्त्यावर कोंढवे धावडेपर्यंत मेट्रो लवकरच धावणार आहे. यासाठी सोमवारी आमदार भीमराव तापकीर यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांसह प्रस्तावित स्थानकांच्या जागेची पाहणी केली. सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारपर्यंत नियोजित मेट्रोचे स्थानक आहे.

त्याचा पुढे खडकवासलापर्यंत विस्तार व्हावा तसेच एनडीए रस्त्यावर वारजेपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचा शिवणे कोंढवे-धावडेपर्यंत विस्तार होण्यासाठी आमदार तापकीर यांनी नुकतीच महाराष्ट्र मेट्रो रेलच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यानुसार पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ व नियोजन अधिकारी सत्यमुर्ती केनन यांच्या समवेत आमदार तापकीर यांनी खडकवासला येथील नियोजित स्थानकांच्या जागेची पाहणी केली. खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष अशोक मते, विभाग उपाध्यक्ष रूपेश घुले, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तात्रय कोल्हे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सारंग नवले, किशोर पोकळे, यशवंत लायगुडे आदींसह नागरिक या वेळी उपस्थित होते.

पर्यटनाला मिळणार चालना

खडकवासलापर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. धरण चौपाटीसह परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. स्थानिकांसह पर्यटकांची सोय होणार आहे. नियोजित मेट्रोचे स्थानक खडकवासला येथील केंद्रीय जल संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारापर्यंत आहे. त्याचा पुढे खडकवासलापर्यंत विस्तार होण्यासाठी मेट्रो प्रशासनाने अनुकूल असल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी स्पष्ट केले.

सिंहगड व एनडीए रस्त्यावरील नियोजित मेट्रो मार्गाचा पुढे विस्तार होण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडे मागणी केली आहे. खडकवासला हे पर्यटनस्थळ आहे, तसेच एनडीए, जलसंशोधन केंद्र आदी महत्त्वाच्या शासकीय संस्था आहेत. त्यामुळे धरणापर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास आगामी काळात वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

– भीमराव तापकीर, आमदार.

हेही वाचा

सिंचन विहीर योजनेतून वगळण्यात आलेल्या गावांनाही लाभ मिळणार : आ. कुणाल पाटील

सलग सहा तास विद्यार्थी करणार वाचन; बार्टीचा उपक्रम

मुंबई : अल्पवयीन मुलींसमोर अश्लिल चाळे करणारा गजाआड

Back to top button