पुणे

Pune News : निर्माल्याच्या दुर्गंधीचा नागरिकांना त्रास

अमृता चौगुले

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या तोंडावर सुतारवाडी, सूस रोड परिसरातील नागरिकांना सडलेल्या निर्माल्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. खतनिर्मितीसाठी पाषाण तलाव परिसरात या निर्मल्यावर प्रक्रिया केली जात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून ही समस्या उद्भवल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे निर्माल्य तातडीने उचलण्याची मागणी होत आहे.

सुतारवाडी येथील पाषाण तलाव परिसरात गणेशोत्सवातील निर्माल्याचे संकलन करून त्याचे खत तयार करण्यासाठी जनवाणी संस्थेने ते या ठिकाणी आणून ठेवले आहे. सध्या या निर्माल्यावर कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याने त्याची एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात उसाच्या मळीसारखी दुर्गंधी पसरली आहे, यामुळे नागरिकांना संध्याकाळच्या वेळी घराबाहेर फिरणेही अवघड झाले आहे. निर्माल्यावर प्रक्रिया करण्यासाठी जनवाणी संस्थेने चुकीची जागा निवडली आहे.

त्यामुळे इथून पुढे या ठिकाणी निर्माल्यावर प्रक्रिया करण्यासाठी ही जागा देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांनी सहायक आयुक्तांकडे केली आहे. जनवानी संस्थेचे मयूर खराडे यांनी सांगितले की, गणेशोत्सवातील निर्माल्यावर या ठिकाणी प्रक्रिया करण्यात येत आहे. परिसरात दुर्गंधी पसरू नये म्हणून या निर्माल्यावर अमृतपाणी म्हणजे तूप, मध, वापरले असून, ते झाकून ठेवले आहे. खतनिर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, दुर्गंधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहोत.

निर्माल्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याने ते सडल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाषाण तलाव परिसर पर्यटन क्षेत्र आहे. तसेच सकाळ व संध्याकाळ या ठिकाणी नागरिक स्वच्छ हवेत फिरण्यासाठी येतात. परंतु, निर्माल्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण दूषित झाले आहे.

-अतुल यादव, रहिवासी

निर्माल्याच्या दुर्गंधीबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार संबंधित संस्थेला दुर्गंधी पसरणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

-गिरीश दापकेकर,
सहायक आयुक्त

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT